बायकोसोबत नाचले म्हणून लहान भावांना चाकूने भोसकलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या बायकोसोबत वरातीत नाचणाऱ्या दोन भावांना एका नराधमाने जिवानिशी मारल्याची धक्कादायक घटना छत्तीसगढ येथील कबीरधाम जिल्ह्यात घडली आहे. आरोपीने त्यानंतर आपला मेहुणा आणि मोठ्या भावावरही हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं आहे.

छत्तीसगढच्या कबीरधाम जिल्ह्यात हा प्रकार घडला. या आरोपीचं नाव तिन्हा बेगा असं असून तो बांगौरा गावात राहतो. येथे गावातील एका घरात लग्नसोहळा होत होता. लग्नानंतर काढलेल्या वरातीत तिन्हाची बायको नाचत होती. तिच्यासोबत तिन्हाचे दोन लहान भाऊ, त्याचा मेहुणा आणि मोठा भाऊही नाचत होते. ते पाहून संतापलेल्या तिन्हा बेगाने बायकोवर चाकूने हल्ला केला.

तिच्या बचावासाठी मध्ये पडणाऱ्या दोन लहान भावांना तो चाकू लागला आणि ते जागीच गतप्राण झाले. त्यानंतरही तो थांबला नाही. त्याने त्याच चाकूने त्याचा मोठा भाऊ आणि मेहुण्यावर हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केलं.

या प्रकरणी तिन्हा बेगाला अटक करण्यात आली असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर उर्वरित दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.