महानगरपालिकेत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने 4 लाखांचा गंडा

शादी डॉटकॉम वेबसाईटवर झालेल्या ओळखीतून एकाने तरूणीच्या भावाला पुणे महानगरपालिकेत अतिक्रमणविरोधी सहायक अधिकारी पदावर नोकरीला लावण्याच्या आमिषाने 4 लाखांचा गंडा घातला.

हर्षल उर्फ हरिश्चंद्र प्रभाकर बटुळे (वय 30, रा. विश्रांतवाडी) याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मांजरी बुद्रुक परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मांजरी गावातील गोसावी वस्तीवर राहण्यास आहेत. त्यांची हर्षलसोबत जीवनसाथी डॉटकॉम माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांना कुटुंबासमवेत भेटले होते. त्यामुळे फिर्यादी तरूणीला हर्षल यांचा विश्वास बसला.

त्याचा गैरफायदा घेउन हर्षलने फिर्यादी तरूणीच्या भावाला पुणे महानगरपालिकेत अतिक्रमण विभागामध्ये सहायक अधिकारी पदावर नोकरीला लावतो असे सांगितले. त्यासाठी त्याने फिर्यादी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 4 लाख रुपये घेतले.

रक्कम घेउनही त्याने फिर्यादीच्या भावाला नोकरी लावली नाही. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या