गुन्हेगारांची हिंमत वाढली, पोलिसांकडे तक्रार केल्याने अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात धमकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सामना प्रतिनिधी । पुणे

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने तरूणाची पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी त्याला अटक झाली. त्याचा राग मनात धरून या नराधमाने अल्पवयीन मुलीचा पुन्हा पाठलाग सुरू केला. भर रस्त्यात बसथांब्यावर तिला आडवून तुला मी सोडणार नाही असे धमकावून शिवीगाळ केल्याचा प्रकार सोमवार पेठेत घडला. विकास सनिल घोडके (वय 25, वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 16 वर्षीय मुलीने याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास घोडके आणि पीडित मुलगी ही एकाच भागात राहायला आहेत. त्याने तिची छेडछाड केल्याने चंदननगर पोलिसांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती, सध्या तो जामीनावर बाहेर आहे. बुधवारी ही मुलगी महाविद्यालयातून घरी जात होती. सोमवार पेठेत बसथांब्यावर उभी असातना आचानक घोडके तेथे आला. ‘तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. तुला मी सोडणार नाही. तुझ्यामागे माझे मित्र लावणार आहे, तू कुठे जातेस, काय करतेस, हे मला सगळे माहित आहे’ असे म्हणत तिचा हात धरून ओढून विनयभंग केला. तसेच तिला शिवीगाळ करून धमकावले. या मुलीने समर्थ पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास उपनिरीक्षक कापुरे करत आहेत.