
थकबाकीमुळे अगोदरच घरचा विद्युत पुरवठा खंडित केला असताना शेजारच्या घरात ऑक्सिजनवर उपचार सुरू असलेल्या एका तरुणाचा वीजपुरवठय़ाअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना करवीर तालुक्यातील उचगाव येथे घडली. अमिश आप्पा काळे (वय 38, रा. शांतीनगर) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी भरपावसात सीपीआरमधील शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले.
अमिश काळे हा परिवारासह उचगाव येथे राहात असून, गेल्या दोन वर्षांपासून फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होता. बंगळुरू येथे उपचारानंतर घरातच ऑक्सिजनवर उपचार सुरू होते. वीजबिल थकल्यामुळे महावितरणने बिलासाठी तगादा लावला होता. वीजबिल भरण्यास त्यांनी 2 जूनपर्यंत मुदत मागितली होती. मात्र, महावितरणने 30 मे रोजी त्यांची वीज तोडली होती. त्यामुळे शेजारी नातेवाईकांच्या घरी अमिशवर उपचार सुरू होते. आज सकाळी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ऑक्सिजनअभावी अमिश काळे यांचा मृत्यू झाला.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात शवविच्छेदन सुरू असताना नातेवाईकांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत भरपावसात ठिय्या आंदोलन केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी तसेच गांधीनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
































































