नोकरीचे आमिष दाखवून शिक्षिकेवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुरुग्राम

हरीयाणा मधल्या गुरूग्राम शहरात एका शिक्षिकेला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. काम देण्याच्या बहाण्याने या नराधमाने महिलेला भेटायला बोलावले. तिला पेयातून अंमली पदार्थ दिल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला व या घटनेचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करत होता. रोजच्या या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पीडित महिला शीलता कॉलनीत राहत असून ती एका खासगी शाळेत शिक्षिका होती. पण नोकरी पक्की नसल्याने ती सरकारी नोकरीच्या शोधात होती. त्याच दरम्यान ऑक्टोबर २०१४ साली तिची ओळख फरीदाबाद मध्ये राहणाऱ्या मनोज या तरुणाशी झाली. सरकारी नोकरीच्या शोधात असल्याचं तिनं मनोजला सांगितले. यावर आपल्या अनेक ओळखी असल्याचं सांगत मनोजने एका फॉर्मवर तीची सही घेतली. त्यानंतर तो वरचेवर तिला भेटायला बोलवू लागला. याच दरम्यान त्याने महिलेला नोकरी संदर्भात मुलाखत असल्याच सांगून एका हॉटेल मध्ये नेलं. तिथे त्याने तिला अंमली पदार्थ टाकलेले कोल्ड ड्रींक दिले. ती बेशुद्ध होताच त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तीचे अशलील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करू लागला. त्याने तिच्याकडून १४ लाख रुपये उकळले. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितीने पोलीसांत तक्रार दाखल केली.