खरेदीसाठी आलेल्या ज्येष्ठाला लुटणारा सराईत जेरबंद, खडक पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मकरसंक्रातीनिमित्त मंडई परिसरात खरेदीसाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावत जबरदस्तीने त्यांच्याकडील रोकड चोरून नेणार्‍या सराईताला खडक पोलिसांच्या पथकाने 24 तासांच्या आत अटक केली.

समीर उर्फ मेहबुब छोटुमियाँ शेख (43, रा. भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख हा रेकॉर्डवरील सराईत असून त्याच्यावर यापुर्वी लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. तक्रारदार हे सणानिमित्ताने मंडई परिसरात खरेदीसाठी आले होते. खरेदीनंतर ते बाजीराव रस्त्याच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या सराईताने त्यांना अडविले. त्यानंतर त्यांना धमकावून पायजमाच्या खिशातील अडीच हजार रुपयांची रोकड चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरवात केली. त्यानंतर अवघ्या 24 तासांत आरोपी शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश जाधव, उपनिरीक्षक अतुल बनकर, अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, रफिक नदाफ, अक्षयकुमार वाबळे, नितीन जाधव, महेश जाधव, योगेश चंदेल यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.