Video : मुंबई विमानतळाच्या सुरक्षेचे निघाले धिंडवडे, झोपडपट्टीतील वेडा पोचला धावपट्टीवर

481

सणासुदीच्या दिवसांत दहशतवादी कारवायांची शक्यता असल्याने देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. असे असताना गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेला एका मनोरुग्णाने हादरा दिला. विमान जवळून पाहण्यासाठी त्याने चक्क विमानतळाच्या भिंतीवरून उडी मारली. नंतर इमर्जन्सी गेटमधून ‘घुसखोरी’ करून धावपट्टीवरच्या विमानाला हात लावला. या घटनेने सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुरक्षेच्या बाबतीत मुंबई विमानतळाने जगात नावलौकिक कमावलाय. मात्र गुरुवारी विमानतळाशेजारील झोपडपट्टीतील कामरान अब्दुल हलीम शेख या 26 वर्षांच्या मनोरुग्णाने कडेकोट सुरक्षाकवच भेदून विमानतळाच्या भिंतीवरून उडी मारली आणि थेट धावपट्टीवर धाव घेतली. या धावपट्टीवर स्पाईस जेटचे बंगळुरूला जाणारे विमान हवेत उडण्याच्या तयारीत होते. कामरानने विमानाच्या खाली फिरून चक्क इंजिनला हात लावला. हा गंभीर प्रकार निदर्शनास येताच वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे इंजिन तत्काळ बंद केले आणि ‘घुसखोरा’ची माहिती एटीसीला दिली. त्यानंतर लगेच सुरक्षा यंत्रणांच्या गाडय़ा विमानाच्या दिशेने वळल्या आणि घुसखोराला धावपट्टीपासून बाजूला नेण्यात आले. विमानतळावर ’रेड ऍलर्ट’ जारी केलेला आहे. असे असतानाही कामरानने चोरटय़ा मार्गाने धावपट्टी गाठून विमानतळ सुरक्षेची लक्तरे काढली

डीजीसीए, सीआयएसफची कारवाई
या घटनेची डीजीसीए, सीआयएसएफने कसून चौकशी सुरू केली आहे. तरुणाच्या घुसखोरीने विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाटय़ावर आल्या आहेत. या त्रुटी शोधून बेफिकीर सुरक्षा अधिकाऱयांवर कारवाई केली जाणार आहे, तर मुंबई पोलिसांनी कामरानला शुक्रवारी अटक करून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

गुल पनागने केले ट्विट
अभिनेत्री गुल पनागने विमानतळावरील या घुसखोरीचा व्हिडीओ ट्विट केला. त्यासोबत विमानतळ सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. ‘हा माणूस विमानाच्या इतक्या जवळ पोचलाच कसा, धावपट्टीवर कसा घुसला, सीआयएसएफ काय करत होती? कोणाचेही इंजिनपर्यंत जाणे अविश्वसनीय आहे’ अशा शब्दांत गुल पनागने सुरक्षा यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली..

आपली प्रतिक्रिया द्या