
लग्नानंतर दोन महिन्यातच पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याने दुखी झालेल्या पतीने पत्नीचे अंत्यसंस्कार झाले त्याच स्मशानात गळफास घेत आत्महत्या केली आहे. छत्तीसगढमधील बालोद गावात ही घटना घडली आहे. मनीष नेताम असे त्या तरुणाचे नाव असून तो पोलीस म्हणून कामाला होता.

मनीषचे दोन महिन्यांपूर्वीच लता नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. त्याने त्या आधीच गावात नवीन घर देखील बांधले होते. नवीन घर, नवे नवे लग्न असा सुखाचे आयुष्य तो जगत होता. मनीष व लताचा संसार देखील आनंदात सुरू होता.

मात्र नियतीला त्यांचा हा संसार पाहावला नाही. मनीष कामाला गेलेला असताना लताचा घरातील लादीवरून पाय घसरला. ती जमिनीवर आपटली. या अपघातात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला. लताच्या मृत्यूचे दुख मनीषला सहन होत नव्हते. तो दररोज लताचे अंत्यसंस्कार झाले त्या स्मशानात जाऊन बसायचा.

बुधवारी नेहमीप्रमाणे मनीष स्मशानात गेला. तेथून त्याने त्याच्या मोठ्या भावाला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवला व त्यानंतर तेथेच असलेल्या एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.






























































