बायकोला लठ्ठपणावरून टोमणे मारत छळ केला; पतीविरोधात तक्रार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरा-बायकोमधील भांडणे, उणी-दुणी काढणे, टोमणे मारत विनोद करणे या संसारातील नेहमीच्या गोष्टी आहेत. याच गोष्टीवरून अनेक विनोदही आहेत. तसेच लठ्ठपणावरूनही अनेक विनोद आहेत. मात्र, पत्नीला लठ्ठपणावरून टोमणे मारणे आणि तू मला आवडत नसल्याचे सांगणे या कारणावरून गुजरातच्या अहमदाबादमधील एका महिलेने पतीविरोधात महिला पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पतीने आपल्याला लठ्ठपणाविरोधात टोमणे मारत आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

अहमदाबादच्या वासणा परिसरात महिला नवऱ्यासह राहाते. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने आनंदात आणि सुखात गेले. तेव्हा सासरच्या कोणाचीही आपल्याबाबत कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, त्यानंतर सासरच्यांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली. तुझे वजन वाढत आहे, ते नियंत्रणात ठेव, कमी खा असे टोमणे पती मारत होता. त्यानंतर त्याचे टोमणे मारण्याचे प्रमाण वाढले. सासरच्यांकडूनही असेच टोमणे मारण्यात येत होते. आपण ते सर्व सहन केले. त्यानंतर मात्र तू लठ्ठ असल्याने मला आवडत नाही. आईवडिलांच्या दबावामुळे तुझ्याशी लग्न केले, असे पतीने मला सांगितले. त्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. पतीने आपल्याला टोमणे मारणे सुरुच ठेवले आणि नवीन घर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले. तसेच महिन्याभरापूर्वी आपल्याला घराबाहेरही काढले होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे महिलेने सांगितले.