
हातचलाखी करून वृद्धाचे सोने घेऊन पळून गेलेल्या ठगाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. संजय मांगडे असे त्याचे नाव आहे. त्याच्या दुसऱया साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते कांदिवली येथे राहतात. गेल्या महिन्यात ते विरार येथे काम संपवून बोरिवली पूर्व येथून जात होते. तेव्हा एक जण त्यांच्याकडे आला. ओळखलंत का मला? असे तो बोलू लागला. त्यानंतर एकाने त्यांना दुकानाजवळ नेले. पुढे पोलीस उभे आहेत, ते तपासणी करत आहेत, एवढे सोने घालून जाऊ नका, असे एकाने त्यांना सांगितले. संधी मिळताच ठगाने त्यांना एक कागद दिला. त्या कागदात सोने ठेवतो असे सांगून ठगाने हातचलाखी केली.
तेव्हा आणखी एक जण त्यांच्याकडे आला. पुढे पोलीस कारवाई करतील अशी त्यानेदेखील भीती घातली. भीती पोटी त्यांनी तो कागद खिशात ठेवला. त्यानंतर ते ठग तेथून निघून गेले. काही अंतर गेल्यावर त्यांनी तो कागद उघडला. त्यात सोने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तेथील फुटेजची तपासणी केली. त्यावरून पोलिसांनी संजय मांगडेला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.



























































