
मौल्यवान वस्तुंच्या चोरीसाठी पोलिसात तक्रार करण्यात येते. पण मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे एक माणसाने चप्पल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवली आहे.
चप्पल चोरीला जाणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही. आपण सगळेच कधी ना कधीतरी चप्पलचोरी किंवा हरवणे अशा प्रसंगांना सामोरे गेलो आहोत. अशा वेळी चरफडणे किंवा मनातल्या मनात चोरी करणाऱ्याला लाखोली वाहणे ही सर्वसामान्य प्रतिक्रिया आहे. पण, एका इसमाने मात्र ही बाब हलक्यात न घेता थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे.
उज्जैन येथील खाचरोद इथल्या तारोद गावात राहणाऱ्या जितेंद्र बागरी यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांनी संबंधी एक लेखी अर्ज लिहिला आहे. त्यानुसार, माझ्या चपलांची एका अज्ञात व्यक्तिने चोरी केली असून त्या चपलांचा गैरवापर होऊ शकतो आणि त्यात मला अडकवलं जाऊ शकतं. त्यामुळे माझ्या चपलांचा गैरवापर झाल्यास मी जबाबदार राहणार नाही, असं या तक्रारीत म्हटलं आहे.
माझ्या चपलांचा रंग काळा असून त्यांची किंमत 180 रुपये इतकी आहे, असंही या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

























































