जगण्याचा नवा सूर गवसला!

726

>> मंगेश कांगणे, गीतकार

कोकणात शिमग्याचा उत्सव साजरा करून मी मुंबईत आलो आणि दोनच दिवसांत लॉकडाऊन जाहीर झाले. लॉकडाऊनची सुरुवात झाली तेव्हा आपल्याला बऱयाच दिवसांनी घरात छान वेळ घालवता येणार आहे म्हणून मी आनंदी होतो. या काळात मी राहिलेली कामे पूर्ण केली. कुटुंबीयांसोबत छान वेळ घालवला. एरव्ही ज्या लोकांशी फोनवर बोलण्यासाठी वेळ मिळत नाही अशांना आठवणीने फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शाळेतल्या मित्रांना फोन करून जुन्या आठवणींत रमलो. आपण नेहमी भविष्याचा विचार करतो, पण भूतकाळातील गोड आठवणीत रमायला कुणालाच वेळ नसतो.

जसजसे दिवस सरू लागले तसतशी कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी सर्वांची चिंता वाढवत होती. बऱयावाईट बातम्या ऐकू येऊ लागल्या. हातावर पोट असलेल्यांची वाताहत झाली. लॉकडाऊन कधी ओपन होईल याची शाश्वती नव्हती. अशावेळी आपली मानसिक अवस्था नीट ठेवायची असेल तर कलाकार म्हणून मी काय करू शकतो याचा विचार केला. 2013 साली ‘दुनियादारी’ चित्रपट रिलीज झाल्यापासून आतापर्यंत मी फक्त गाण्यांवरच काम करतोय. लॉकडाऊनदरम्यान मात्र मी फक्त गाण्यांवरच फोकस केला नाही, तर मला आवडेल ते केले. मला सिनेमांची खूप आवड आहे. सिनेमातील आवडत्या सीनमधील संवाद आणि विनोदी कथानकाचा अभ्यास केला. अनेक कविता लिहिल्या, नवनवीन विषयांवर कथा लिहिल्या, गाण्यांचे विडंबन केले, चित्र काढले. सिनेमा आणि वेबसीरिजसाठी लिखाण केले. या साऱया गोष्टींमधून माझा मी नव्याने सापडायला लागलो.

या काळात अनेक सण-उत्सव सुनेसुने गेले. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीलादेखील कोरोनाचा फटका बसला. विठ्ठलाची माफी मागण्यासाठी मी एका हिंदी कवितेतून त्याच्याशी संवाद साधला.

माफ करना विठ्ठल जी
इस बार पंढरपुर दर्शन लेने आ नहीं सकते
हालात ही कुछ ऐसे है
बस हालात बिगड़े है, हम बिलकुल ही कैसे है
सारे घर पर रहते है, अब घर घरसा लगता है
कलसे सबकुछ ठीक होगा
दिल अरमा लेकर जगता है
टिव्ही ख़बरें देख-देखकर बच्चे बहोत कुछ सिखते है
और नन्हे नन्हे हाथोंको अब दिनभर धोते रहते है

विठ्ठला… मी यंदा तुझ्याकडे येऊ शकलो नाही. याचा अर्थ मी बदललोय असे नाही. फक्त आजूबाजूची परिस्थिती बदललीय. यावेळी मी ’मजबूर’ आहे, पण तितकाच ‘मजबूत’ आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी यातून केला. कोरोनावर अनेकजण मेमेज बनवतायत, असे मेमेज बनवणारे संकटाचा हसत सामना करतायत असे मी म्हणेन. यू टय़ूबवर टाकलेल्या या कवितेच्या व्हिडीओलादेखील अनेक ह्यूज मिळाले आहेत.

माणसं जोडा, माणुसकी जोपासा!
आज सगळे देव देवळात बसले आहेत. परंतु सर्वसामान्यांची काळजी घेण्यासाठी पोलीस, डॉक्टरांच्या रूपाने देवाच्या सावल्या जगभरात फिरतायत. कोरोना झालेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये त्यांचे रक्ताचे नातेवाईक जाऊ शकत नाही. पण ही देवमाणसं आज त्यांची काळजी घेतायत. खरंच माणुसकी अजून जिवंत आहे. माणसातील देव ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. यानिमित्ताने आपण माणसांशी नव्याने जोडलो गेलोय. एखादा माणूस जन्माला येतो आणि त्याला जगाचा नव्याने अनुभव येत जातो तसा अनुभव यादरम्यान आला.

ही लढाई एकत्र लढण्याची!
कोरोनाविरुद्धची ही लढाई कुणा एकटय़ाची नाही, तर सर्वांनी मिळून लढण्याची ही लढाई आहे. संकट कोणतेही असो, त्याने खचू नका. आयुष्यात माणसे जोडून त्यांच्याशी नाते जपा. सुखाला अंत नाही. चार माणसे एकत्र येऊन आपण आनंद सेलिब्रेट करू शकतो, पण आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा आपल्या आजूबाजूला पाच-पन्नास माणसे असतील तर संकटाचा सामना करण्याचे बळ येते.

आपली प्रतिक्रिया द्या