
>> मंगेश वरवडेकर
हायव्होल्टेज, महामुकाबला, क्रिकेटयुद्ध, धर्मयुद्ध, ब्लॉकबस्टर अशी अनेक विशेषणं हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीला देण्यात आली होती. पण या सामन्यात हे सारं दिसलं का? बिल्कुल नाही. सर्व गायब होतं. ना व्होल्टेज हाय होतं, ना मुकाबला महा वाटला, ना युद्ध रंगलं. वाटलं ती लुटूपुटूची लढाई. एकतर्फी लढाई. खेळाची हीच अनिश्चितता या सामन्यात दिसली.
क्रिकेटला थराराचं भाग्य लाभावं लागतं. त्यासाठी संघही तुल्यबळ असावे लागतात. परिस्थितीही सारखीच असावी लागते. पण शनिवारी परिस्थिती जराही सारखी नव्हती. वर्ल्ड कपमधली ही सर्वात मोठी मॅच पूर्णपणे हिंदुस्थानसाठीच असल्यासारखी दिसली.
पाकिस्तान संघाने वर्ल्ड कपमध्ये खेळावे म्हणून तब्बल सहा महिने वाद रंगले. त्यांचे कभी हा कभी ना होत होते. अखेर ते नमले. पैशांपुढे अवघं जग झुकतं. तेसुद्धा झुकले. ते हिंदुस्थानात आले. हैदराबादमध्ये दोन सामने खेळले. त्यांना आपल्या देशातच खेळत असल्यासारखे वाटले. मग अहमदाबादमध्येही त्यांची मेहमाननवाजी अभूतपूर्व करण्यात आली, पण ती मेहमाननवाजी होती की बळी देण्याआधीची पूजा. नेमकं कळलं नाही.
इतक्या मोठय़ा लढतीला पाकिस्तानी प्रेक्षकांना व्हिसा मिळाले नाहीत. परिणामतः मैदानात ना पाकिस्तानचे अस्सल पाठीराखे दिसले ना अस्सल क्रिकेटप्रेमी. 25 हजार तिरंग्यांसमोर चांदतारा असलेला पाकिस्तानचा एकही राष्ट्रध्वज फडकला नाही. हे चित्र फार खटकणारं होतं. त्यांच्या चौकार-षटकाराला तसेच विकेटला मैदानात चक्क स्मशानशांतता पसरायची. त्यांच्यासाठी कुणीच टाळय़ा वाजवत नव्हतं. असं होत असले तरी त्यांच्या कामगिरीचं कौतुक करणारी हजारेक मंडळी असती तर सामन्यात आणखी मजा आली असती. 2011 च्या वर्ल्ड कपदरम्यान तब्बल 7500 पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यात आला होता. पण अहमदाबादेत असं का घडलं ? हे कळलेच नाही. यामुळे हा सामना मला 11 पाकिस्तानी विरुद्ध अकरा हिंदुस्थानी नव्हे तर एक लाख हिंदुस्थानी असाच खेळला गेल्यासारखा वाटला.
मला वाटायचं आयसीसी वर्ल्ड कप ही आयसीसीची आयकॉनिक स्पर्धा आहे. आयसीसीचा बिग इव्हेंट आहे. पण अहमदाबादची लढत पाहिल्यावर माझा भ्रमनिरास झाला. खरं सांगायचं तर हा सामना मला बीसीसीआयचाही वाटला नाही. तो मला गुजरात क्रिकेट संघटनेचा इव्हेंट वाटला. इथे प्रत्येक षटकामागे फक्त हिंदुस्थानची गाणी वाजली. ‘जीतेगा भाई जीतेगा’चा आवाज बुलंद झाला. ‘जय श्रीराम’चा आवाजही घुमत होता, पण पाकिस्तानी गाणे वाजले नाही. हे वर्ल्ड कप आहे. इथे असं व्हायला नको होतं. इथे दोन्ही संघांना समान वागणूक आणि वातावरण मिळायलाच हवं. मग तो संघ कुणीही असो.
पाकिस्तानला स्फूर्ती मिळेल, असं काही केलं गेलं नाही. पाकिस्तानी संघांचं कौतुक फक्त त्यांचे संघसहकारी आणि सात पत्रकार करत होते. हिंदुस्थानच्या खवळलेल्या निळय़ा महासागरात 11 पाकिस्तानी अक्षरशः वाहून गेले. त्यांना जलसमाधी मिळाली. ते खेळले आणि लढले असते तर सामन्यात थरार दिसला असता. पण ते भेदरलेल्यासारखेच खेळले. जणू ते पराभव घेऊनच उतरले होते. त्यामुळे त्यांचा संघर्षही मैदानाबाहेर पळून गेला. जे हैदराबादला दिसलं ते अहमदाबादला का नाही? प्रश्न तर पडणारच. खेळाच्या मैदानात खेळाडूंकडूनच नव्हे तर प्रेक्षकांकडूनही खिलाडूवृत्तीची अपेक्षा असते. पण ती कुठेच दिसली नाही, जाणवली नाही. इथे फक्त एकच गोष्ट दिसली गेली. विकलीही गेली, ती म्हणजे हिंदुस्थान-पाकिस्तानची दुश्मनी. जोपर्यंत सीमेवर शांतता पसरत नाही तोपर्यंत क्रिकेटच्या मैदानावरही ती पुसली जाणार नाही.



























































