मणिपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यात 76 टक्के मतदान, निवडणूक हिंसाचारात दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी 76 टक्के मतदान झाले. या टप्प्यात 8.38 लाख मतदारांनी मताधिकाराचा वापर केला. निवडणूक हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला.

मणिपूर विधानसभेच्या 60 जागांपैकी शनिवारी दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती. लम्बुंग पिंक या मतदान केंद्रावर महिलांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली होती. मतदानाची वेळ सायंकाळी चार वाजेपर्यंत होती. कोरोनाबाधित व क्वारंटाईन असलेल्या नागरिकांना शेवटच्या तासात मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मतदानासाठी एकूण 1247 केंद्रे बनविण्यात आली होती. या टप्प्यात दोन महिला उमेदवारांसह 92 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.

उत्तर प्रदेशातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

उत्तर प्रदेशात शेवटच्या आणि सातव्या टप्प्याचे मतदान सोमवार, ७ मार्च रोजी होत आहे. या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत रोड शो केला. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी व राहुल गांधी यांनीही रोड शो केला.

आता लक्ष मतमोजणीकडे

गेला महिनाभर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा तसेच मणिपूर या पाच राज्यांतील निवडणूक रणधुमाळीने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत आणि उर्वरित तीनही राज्यांत एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. सर्व राज्यांतील मतदानाची मतमोजणी 10 मार्च रोजी करण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत बहुतेक निकाल हाती येण्याची शक्यता आहे.