
मणिपुरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीए. विष्णुपूर-चुराचंदपूर या तणावग्रस्त भागात पुन्हा हिंसाचार उफाळून आला. 24 तासांत बापलेकासह सहा जणांची हत्या करण्यात आली, तर 16 जण जखमी झाले. तसेच 15 घरे पेटवून देण्यात आली. शुक्रवारपासून या भागात मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार सुरू असून सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. जवानांनी तातडीने हल्लेखोरांची शोधमोहीम सुरू केली असून यादरम्यान बंदुकीची गोळी लागून जखमी झालेल्या एका बंडखोराला लष्कराने ताब्यात घेतले आहे.
हल्लेखोरांकडून दोघांना अतिशय जवळून गोळ्या घालण्यात आल्या. त्याआधी दोघांच्या शरीराच्या विविध भागांवर अतिशय धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते, अशी माहिती सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली.
भाजप आमदारांना टेन्शन
21 ऑगस्टपासून मणिपूर विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र या अधिवेशात पाय ठेवण्यास भाजप आमदार प्रचंड घाबरत असल्याचे समोर आले आहे. इंफाळपर्यंत जायचे कसे? सुरक्षेचे काय? अशा प्रश्नांनी त्यांना भंडावून सोडले आहे. मणिपूर विधानसभेत कुकी-झोमी समाजाचे एकूण 10 आमदार असून यात भाजपाच्या 7 आमदारांचा समावेश आहे.
भाजपला झटका… कुकी पीपल्स अलायन्सने पाठिंबा काढला
एनडीए सरकारमधील सहभागी कुकी पीपल्स अलायन्स (केपीए) पक्षाने मणिपूरच्या बिरेन सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. सातत्याने वाढत्या वांशिक हिंसाचारात गेल्या तीन महिन्यांत 160 बळी गेलेल्या मणिपूरमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारशी संबंध तोडण्याचा निर्णय केपीएचे अध्यक्ष तोंगमांग हाओकिप यांनी एका पत्राद्वारे राज्यपाल अनुसुईया उईके यांना कळवला आहे. 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत केपीएचे किमनिओ हाओकिप हँगशिंग आणि चिनलूनथांग हे दोन आमदार आहेत. भाजपचे 32 आमदार असून त्यात काही कुकी समाजाचेही आमदार आहेत.
























































