मणिपूर हिंसाचार- आरक्षणावरून मणिपूर पेटले; आठ जिल्ह्यांत संचारबंदी, आतापर्यंत 54 ठार, 100 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैतेई आरक्षणावरून मणिपूर पेटले असून आठ जिह्यांत हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 54 जण ठार झाले असून 100 जण गंभीर जखमी झाली आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आठ जिह्यांत संचारबंदी लागू केली असून मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याने सरकारने लष्करासह असाम रायफल्सचे दहा हजारांहून अधिक जवान येथे तैनात केले आहेत.

मणिपूरमध्ये बुधवारपासून सुरू झालेल्या हिंसाचारात शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे भीतीपोटी जिराबाम जिह्यातील 1100 हून अधिक नागरिक आसाममध्ये शरण गेले आहेत. यामध्ये कुकी समाजाच्या लोकांची मोठी संख्या आहे. आतापर्यंत 54 लोकांचा बळी गेला असून अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर आरआयएमएस इंफाळ आणि जवहारलाल नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिल्ली युनिव्हर्सिटीच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये मैतेई समाजाच्या विद्यार्थ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप करत कुकी समुदायाचे विद्यार्थी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले होते, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे.

दिसताक्षणी गोळय़ा घालण्याचे आदेश

  • मणिपूरमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हिंसाचार करणाऱयांना दिसताक्षणी गोळय़ा घालण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच मणिपूरच्या दिशेने जाणाऱया रेल्वेगाडय़ाही थांबवण्यात आल्या आहेत.
  • हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने राज्यात होणाऱया ‘नीट-पीजी’च्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मणिपूरमध्ये सेंटर मिळाले आहे त्यांच्या परीक्षा पुन्हा होणार आहेत.
  • शुक्रवारी दुपारी एका उग्रवाद्याने सीआरपीएफच्या कोबरा बटालियनच्या एका कमांडोला गोळी घालून हत्या केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
  • सीआरपीएफने सुट्टीवर गेलेल्या जवानांच्या सुट्टय़ा तत्काळ रद्द केल्या असून त्यांना नजीकच्या बेसवर हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे आरक्षणाचा वाद

मणिपूरमध्ये एकूण 38 लाख लोकसंख्या असून त्यामध्ये अर्ध्याहून अधिक मैतेई समाज आहे. मणिपूरच्या केवळ 10 टक्के क्षेत्रावर इंफाळ घाटी असून तेथे मैतेई समाज मोठय़ा प्रमाणात आहे. नुकतेच मणिपूर उच्च न्यायालयाने मैतेई समाजाला अनुसूचित जनजाती (एसटी) अंतर्गत आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच मैतेई समाजाकडून आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. त्याला नगा आणि कुकी समाजाकडून विरोध केला जात आहे. त्यामुळेच येथे हिंसाचार सुरू झाला आहे.