गतिमंद कृष्णाची ‘निर्भया’मुळे घरवापसी, मानखुर्द पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रॉम्बे पोलिसांच्या ‘निर्भया’ पथकाने तीन वर्षांच्या गतिमंद मुलासह त्याच्या पालकांना मोठा दिलासा दिला. खेळण्याच्या नादात घराबाहेर पडलेला मुलगा भरकटला आणि रस्ता चुकला. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात राहणारा कृष्णा हा तीन वर्षांचा मुलगा गतिमंद असून तो खेळण्याच्या नादात परिसरातून अचानक बेपत्ता झाला. दरम्यान, उपनिरीक्षक शैलाबी पठाण तसेच आव्हाड, वाघमोडे हे ‘निर्भया’ पथक मानखुर्द परिसरात गस्त घालत असताना महाराष्ट्र नगरातील खंडोबा मंदिराजवळ एक बालक मिळून आल्याची माहिती अंमलदार पालवे यांनी पथकाला दिली. ‘निर्भया’ पथकाने कृष्णाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांचा कसून शोध सुरू केला. अखेर कृष्णाच्या पालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले.

 ‘निर्भया’ पथकाला महाराष्ट्र नगरात गस्तीवेळेस एक मूकबधिर महिला भरकटताना दिसली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, पण तिला तिच्याबद्दल काही सांगता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करून त्या महिलेची चेंबूर येथील कस्तुरबा महिला वसतिगृहात रवानगी केली.