
सामना प्रतिनिधी, मनमाड
नार-पारच्या पाण्यासाठी शेतकरी लाँग मार्चला पाठिंबा व्यक्त करून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच मिळावे, या मागणीसाठी मनमाड बचाव कृती समितीतर्फे गुरूवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ धरणे आंदोलन करण्यात आले. बचाव समितीचे अशोक परदेशी, सुरेश वाघ, रामदास पगारे, आर.बी.ढेंगळे, मनोज गांगुर्डे, पुंडलिक कचरे, रमेश खरे, सुषमा तिवारी, सौ.येणारे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा वगैरे भागातून नार-पार, पिंजाळ, दमणगंगा-ताण-बाण आदी नद्यांचे पाणी अरबी सुद्रात वाहून जाते. केंद्र शासनाच्या चितळे आयोगाने सर्वेक्षण करून हे समुद्रात वाहून जाणारे 157 टी.एस.सी. पाणी नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांना दिल्यास बरेच क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. एवढेच नव्हे तर मराठवाडा,विदर्भसह नगर जिल्ह्यालाही हे पाणी उपलब्ध होणार आहे.
मात्र महाराष्ट्र शासन गुजरात आणि केंद्र शासन यांच्या सामजस्य करार होत असून महाराष्ट्राचे हे 157 टी.ए.सी.पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हक्काचे पाणी महाराष्ट्रालाच मिळावे या मागणीसह इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी किसान सभेने 20 फेब्रुवारीपासून नाशिक ते मुंबई असा लाँगमार्च काढलेला आहे. या लाँगमार्चला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. शासनाला निवेदन देऊन धरणे आंदोलनाची सांगता झाली.



























































