उद्योजक श्रीधर जाधव यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योजक, मनोहर डेकोरेटर्सचे प्रमुख आणि ज्येष्ठ शिवसैनिक श्रीधर मुकुंद जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी माजी महापौर व विद्यमान नगरसेविका श्रद्धा जाधव, दोन मुले पवन आणि सागर असा परिवार आहे. श्रीधर जाधव यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

समाजसेवक आणि यशस्वी मराठी उद्योजक म्हणून श्रीधर जाधव यांची ख्याती होती. मित्रपरिवारात आदराने त्यांना ‘शेठ’ असे संबोधले जाई. ‘मनोहर डेकोरेटर्स’च्या माध्यमातून त्यांनी उद्योग क्षेत्रात पाय रोवले. शिवसेनेचे संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती.

उद्धव ठाकरे यांनी केले जाधव कुटुंबीयांचे सांत्वन

भोईवाडा येथील ओमकार वेदा टॉवर येथील निवासस्थानी श्रीधर जाधव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह श्रीधर जाधव यांचे अंत्यदर्शन घेतले आणि जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, आमदार व मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार अजय चौधरी, उपनेते, आमदार सचिन अहिर, मनोज जामसुतकर, उपनेते नितीन नांदगावकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, नगरसेवक किरण तावडे, उर्मिला पांचाळ यांच्यासह शिवसैनिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.