मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे जन्मगाव असलेल्या माणगावजवळील नांदवी येथे धडकताच नांदवीसह परिसरावर शोककळा पसरली. नांदवीकर हळहळले आणि मनोहर जोशी यांचे शाळकरी मित्र गहिवरले, त्यांना अश्रू अनावर झाले.
रायगड जिह्यातील माणगाव तालुक्यात अत्यंत छोटे गाव असणारे नांदवी जगाच्या नकाशावर आले ते मनोहर जोशींमुळेच. याच गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जोशी कुटुंबात जन्मलेल्या मनोहरपंतांचे नांदवीतच चौथीपर्यंत शिक्षण झाले. घरोघरी जाऊन माधुकरी मागायची आणि उदरनिर्वाह करत शिक्षण घ्यायचे हा मनोहर जोशी यांचा शिरस्ता. चौथीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना महाडला जावे लागले. तिथेही तोच दिनक्रम… पुढे काय करायचे असा प्रश्न असतानाच बालपणीच ते पनवेल येथे मामा सुधीर जोशी यांच्याकडे गेले. तिथेही सकाळी दारोदार वर्तमानपत्रे टाकायची आणि शिक्षण घ्यायचे हा वसा त्यांनी सोडला नाही. पुढे मुंबई महापालिकेत नोकरी लागली आणि मनोहर जोशी यांनी नांदवी येथून आपला मुक्काम मुंबईत हलवला.
राजकीय जीवनात पाऊल टाकल्यानंतर मनोहर जोशी हे नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, खासदार, पेंद्रीय मंत्री ते थेट लोकसभेचे अध्यक्ष बनले, परंतु ते कधीच जन्मभूमी नांदवीला विसरले नाहीत. प्रत्येक पदावर असताना त्यांनी आपल्या नांदवी गावाला भेट देऊन आपुलकी कायम जपली होती इतकेच काय तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ग्रामस्थांच्या आग्रहास्तव नांदवीत आणून तेथील दत्त मंदिराचे भूमिपूजनही शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते केले होते. त्यांच्या निधनाने नांदवीला वेगळी ओळख देणारा दुवा आज निखळला.
सरांमुळेच गावची पुढची पिढी शिकली
सर नसते तर आज नांदवी हे नावदेखील कुणाला माहीत झाले नसते. ज्या गावात चक्क भिक्षा मागून खायची वेळ आली होती. मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षासारखे उच्च पदे मिळाल्यानंतरही ते कधीही गावाला विसरले नाहीत. उलट या गावाची भरभराट कशी होईल, इथला सामाजिक सलोखा टिकून कसा राहील यासाठीच त्यांनी सतत प्रयत्न केले. गावच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा केली. म्हणूनच आज मुलं माध्यमिकपर्यंतचे शिक्षण घेत आहेत, सरांमुळेच पुढची पिढी शिकली, अशी आठवण काढताना माजी सरपंच विलास म्हसकर यांचा पंठ दाटून आला…
पोपटीच्या शेंगा खायच्या आहेत
सर आणि मी एकाच वर्गात शिकत होतो. त्यावेळेस कबड्डी हा सरांचा आवडता विषय. त्यांच्यासोबत मी अनेकदा माधुकरी मागायला जात असे ही ओळख ते कधीच विसरले नाहीत. कुठल्याही पदावर ते असू देत, पण नांदवीत आले की पहिला निरोप पाठवायचे. त्या महादेवला बोलवा. मी भेटलो की ‘काय, महादेव कसा आहेस..? पोपटीच्या शेंगा खायच्या आहेत घेऊन ये…’ हे अधिकारवाणीतले शब्द आता कानावर येणार नाहीत याचे दुखः आहे असे सांगताना मनोहर जोशी यांचे वर्गमित्र महादेव देवघर यांना अश्रू अनावर झाले.
अरे… तुम्ही जोशी सरांचे गाववाले का?
जोशी सरांच्या कृपेने आमच्या नांदवी गावाला वलय मिळाले. कुठेही गेलो आणि नांदवी येथून आलोय असे सांगितले तर लगेच लोपं विचारतात तुम्ही सरांचे गाववाले का…? अशी ओळख केवळ सरांमुळेच मिळाली. त्यांच्यामुळेच आम्हाला शिवसेनाप्रमुखांना जवळून पाहता आले. काही झाले तरीही निष्ठा सोडायची नाही अशी कायम तंबी देणारे सर आता पुन्हा दिसणार नाहीत, अशी भावना साश्रुनयनांनी ग्रामस्थ राजेश म्हाप्रळकर यांनी व्यक्त केली.