
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपसमोर गोव्यात पर्रीकरांच्या जागी दुसरा सक्षम नेता शोधण्याचे आव्हान उभं ठाकलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने राज्यपालांना पत्र लिहून बहुमताच सरकार बनवण्याचा दावा केला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी रात्रीच गोव्यात दाखल झाले असून तेथे ते पक्षाच्या नेत्यांबरोबर बैठका घेत आहेत.
रविवारी रात्री महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे (MGP) नेते सुदीन धवलीकर आणि गडकरी यांच्यातही बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र धवलीकर यांनी पार्टीबरोबर चर्चा केल्यानंतरच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल सांगणार असे म्हटले आहे.
गोव्यात आघाडीचे सरकार असून यात भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी, एमजीपी आणि अपक्ष आमदाराचा समावेश आहे. मात्र पर्रीकरांच्या निधनामुळे भाजपचे संख्याबळ घटल्याने काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. पणजी विधानसभा मतदारससंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पर्रीकरांच्या निधनामुळे पोटनिवडणुका होणे गरजेचे झाले आहे. जर ही पोटनिवडणूक झाली तर गोव्यातील ती चौथी पोटनिवडणूक ठरणार आहे. 23 एप्रिल रोजी शिरोडा, मांडरेम आणि म्हापसा विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत.
काँग्रेसकडे 14 आमदार असून सध्या राज्यातील तो मोठा पक्ष आहे. तर भाजपकडे 13 आमदार आहेत. गोवा फॉरवर्ड पार्टी, एमजीपी आणि अपक्षांचे 3-3 आमदार आहेत. तर एनसीपीचा एक आमदार आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसुझा, आणि पर्रीकर यांचे निधन आणि गेल्या वर्षी काँग्रेसचे दोन आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेचे संख्याबळ 36 झाले आहे.
























































