
दोन वर्षांपासून सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहे. पण आता संयम नाही. सरकारने कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. मुंबईत गेल्याशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, त्यामुळे ‘चलो मुंबई’ असा नारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर ठीक, नाहीतर 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे या वेळी त्यांनी जाहीर केले. आंतरवाली सराटी येथे आज पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. दोन वर्षांपासून आम्ही अतिशय संयम दाखवला आहे. शेवटचे उपोषण सोडवताना सरकारने चार दिवसांत चार मागण्या पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, परंतु आता तीन महिने होत आले. सरकार आपला शब्द विसरले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठा उठाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


























































