
सगेसोयरे कायदा अंमलबजावणीसाठी 10 तारखेपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलायला सध्या नेटवर्क जाम आहे. कोणामुळे झाले हे माहिती नसल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. समाजातील तुरळक नेते व विरोधक आरक्षणासंदर्भात अप्रचार करत असणार्यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. महाराष्ट्र दौर्यावर निघण्याआधी त्यांनी पत्रकारांशी आंतरवाली सराटीत संवाद साधला.
जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईतील उपोषणादरम्यान सरकारला मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या. तरीही हैदराबाद गॅझेट घेतो असे ते म्हणाले. ते घेतले का, समितीकडे दिले का, याची आम्हाला माहिती द्यावी. 17 तारखेला अधिवेशन आहे. 16 तारखेला हरकतीची तारीख आहे. 15 पर्यंत काय सगेसोयरे या कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सरकार मराठा आंदोलकावरील गुन्हेही दोन – तीन दिवसांत मागे घेतो म्हणाले होते.
पाच महिने झाले तरीही घेतले नाही. शासनाने नेमलेल्या समितीने 23 डिसेंबरपासून नोंदी किती तपासल्या, किती नाही याची आकडेवारी नाही. नुसती नोंदीची बढती कागदावर चढली आहे. मराठा समाजाला दाखवण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या गावात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला याद्या लावल्या नाही. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या याद्या उद्यापासून तरी ग्रामपंचायतला लावणार का ? असा प्रश्नही जरांगे पाटील यांनी केला.
सरकार, मंत्री बोलतात; परंतु प्रशासन हे काम करत नाही. त्यांना अभय कोणाचे आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने प्रशासन सुस्तावून महाराष्ट्रात 100 टक्क्यांपैकी फक्त 8 टक्के याद्या ग्रामपंचायतला लावलेल्या आहेत. प्रशासन हे काम करत नाही. सुरू केलेले शिबिर बंद का पडले ? कुणबी नोंदी सापडल्या तर गावा-गावात जनजागृती कऊश्न अर्ज घ्यायचे होते, जलगतीने प्रमाणपत्र द्यायचे होते ते बंद का पडले?, मागासवर्गीय अहवाल समितीने स्वीकारला का? स्वीकारला तर तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहे का, शासन स्तरावर जी प्रकिया सुरू आहे ती आम्हाला माहिती होणे गरजेचे असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
छगन भुजबळांवर सडकून टीका
छगन भुजबळवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, ते राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार. भुजबळ यांनी आता तलाठी बनवावे, असेही जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचा दौरा…
6 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे आंतरवालीहून 12 वाजता निघणार आहेत. शिक्रापूर मार्गे-चाकण आळंदी देवाची, आळंदी येथे ते नियोजित कार्यक्रमाला सायंकाळी 6 वाजता हजेरी लावणार. आळंदीत मुक्काम.
7 फेब्रुवारी : मनोज जरांगे आळंदीहून चाकणमार्गे- खोपोलीमार्गे-पनवेलमार्गे- कामोठे येथे सकाळी 11 वाजता नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार. त्यानंतर नवी मुंबईमार्गे- चेंबूर मार्गे- शिवाजी मंदिर, दादर मुंबई येथे सायंकाळी 6 वाजता नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
8 फेब्रुवारी : दादर मुंबईतून- नाशिकमार्गे- सटाणामार्गे साल्हेर किल्ला येथे सकाळी 11 वाजता नियोजित कार्यक्रम. त्यानंतर सान्हेर किल्ल्याहून छत्रपती संभाजीनगरमार्गे- आंतरवाली सराटी.
9 फेब्रुवारी : आंतरवालीहून– भोगलगाव (जिल्हा-बीड) येथे सकाळी 10 वाजता नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार. त्यानंतर भोगलगावहून – बीडमार्गे- कोळवाडी (मांजरसुबा घाट) येथे दुपारी 12 वाजता नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार. त्यानंतर कोळवाडीहून बीड – गेवराईमार्गे – आंतरवाली सराटी.
10 फेब्रुवारी 2024 : आंतरवाली सराटी येथे सकाळी 10 वाजता महत्त्वाची बैठक व त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.
10 तारखेला बैठक. पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार
10 तारखेला आंतरवाली सराटीत सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणावर ठाम असून, त्यापूर्वी मराठा समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. त्यादिवशी आंदोलनाची पुढील दिशा ठरवून आंदोलन करायाचे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.



























































