…म्हणून असे संवाद लिहिले! आदिपुरुषच्या संवाद लेखकाची सारवासारव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आदिपुरुष हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि त्याने प्रेक्षकांची प्रचंड नाराजी ओढवून घेतली. विचित्र वीएफएक्स, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कथानकातला बदल, प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत अजिबात न शोभणारा प्रभास, रावणाची किळसवाणी तऱ्हा आणि सडकछाप संवाद यांमुळे प्रेक्षक चांगलेच खवळले असून चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांना लाखोली वाहताना दिसत आहेत. त्यात संवाद लेखकाचीही भर पडली आहे.

अत्यंत वाईट पद्धतीने लिहिलेल्या संवादांमुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. रामायण काळातील संवादांऐवजी आजकालच्या भाषेतले संवाद असल्याने प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, या चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी भलतीच सारवासारव केली आहे.

मनोज यांच्या म्हणण्यानुसार, हे संवाद जाणूनबुजून असेच लिहिण्यात आले आहेत. या संवादांचं लेखन चुकून आजचा भाषेत झालेलं नाही. पण, फक्त हनुमंतांच्या संवादावर ही टीका का होत आहे? प्रभू श्रीरामांच्या संवादांवरही कुणीतरी बोलायला हवं. आम्ही जो चित्रपट बनवला आहे, तो रामायणावर आधारित आहे. रामायण अनेक पद्धतींनी सांगितलं जाऊ शकतं, असं संत तुलसीदास म्हणतात. आजच्या तरुणांच्या भाषेत लिहिल्याने चित्रपट त्यांना समजू शकेल, ते त्याच्याशी जोडले जातील म्हणून मी असे संवाद लिहिल्याची सारवासारव मनोज मुंतशीर यांनी केली आहे.