पदार्थांची चव वाढवणारे तमालपत्र आहे औषधी…जाणून घ्या फायदे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्नपदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. भाज्या,पुलाव, लोणचे अशा अनेक पदार्थांमध्ये तमालपत्र वापरल्याने पदार्थाला सुगंध येण्याबरोबच त्याची चवदेखील वाढते. खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तमालपत्रांच्या पानांमध्ये औषधी गुणधर्मही आहेत.

कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि लोह यांचे प्रमाण तमालपत्रात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कर्करोग, ह्रदयविकार आणि रक्तविकाराशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. तमालपत्राचा काढा नियमित घेतल्याने अनेक आजार दूर होतात.

चवीला कडू, उष्ण प्रकृतीचे व लघू गुणाचे तमालपत्र त्रिदोषशमन, विशेषतः कफदोष व वातदोष कमी करते. मुखशुद्धी करून रुची उत्पन्न करते. तसेच तमालपत्र खाणे अत्यंत फायद्याचे आहे. अपचन किंवा पोटाच्या आजार असेल तर चहामध्ये तमालपत्रचा वापर करावा. त्यामुळे कफ, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून आराम मिळतो.

मधुमेही रुग्णांनाही तमालपत्राचा फायदा होतो. रक्तातील साखर यामुळे नियंत्रणात राहते. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्याकरिता तमालपत्राचे सेवन फायदेशर ठरते. फक्ते ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे. ज्यांना निद्रानाशाचा त्रास असेल किंवा रात्री चांगली झोप येत नसेल तर आहारात तमालपत्राचा वापर करा. यामुळे शांत झोप लागते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोगही करतात. या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी घेतल्यास झोपेशी संबंधित त्रास कमी होतात.

तमालपत्राने मुतखडा आणि किडनीसंबंधित समस्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करून प्यायल्याने मूतखडा किंव किडनीचा आजार बरा व्हायला मदत होते. अंग दुखत असेल तर तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो. डोके, मान दुखत असेल तर या तेलाने मसाज केल्याने त्याचा फायदा होतो.

मळमळ, अन्नसेवनाची इच्छा नसणे, मूळव्याध यांसारख्या पचनविकारांवर तमालपत्र उपयुक्‍त आहे. ते शरीरातील विषद्रव्यांना नष्चाट करते, खाज कमी करते. तसेच मूत्राशयासंबंधी रोगांवर उपयुक्‍त ठरते. तोंड चिकट होऊन काहीही खायची इच्छा होत नसल्यास, पोटात जडपणा जाणवत असल्यास दोन चमचे लिंबाचा रस, चार चिमूट सैंधव मीठ व पाव चमचा तमालपत्राचे चूर्ण एकत्र करून थोडे थोडे चाटल्यास तोंडाला चव येते.

सर्दी झाल्याने नाक बंद पडले असता, डोके व डोळे जड झाले असता तमालपत्राचे बारीक चूर्ण हुंगावे किंवा तपकिरीप्रमाणे नाकाने ओढले असता, शिंका येऊन नाक मोकळे होते. डोके हलके होते. स्वयंपाकात तमालपत्राचा वापर नियमित केल्यास अन्नपचनाला मदत मिळते. अन्नाचे पोषण व्यवस्थित होते. पोटात गॅस होणे, मलावरोध वगैरे त्रास होत नाहीत. सुगंधामुळे व रुची वाढवण्याचा गुण असल्यामुळे व श्वसनसंस्थेवर कार्य करत असल्याने च्यवनप्राश, वासावलेह, कंटाकार्यावलेह सारख्या अनेक औषधांत तमालपत्र वापरले जाते.

तमालपत्राचा काढा कसा कराल ?
तमालपत्राची चार पाने, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा बडीशेप एकत्र करून त्याची मिक्सरमध्ये पावडर करा. ही पावडर एक लिटर पाण्यात घालून पाणी व्यवस्थित उकळू द्या. पाणी उकळून पातेल्यात अर्धे पाणी शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. पातेल्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे झाकून ठेवा. काही वेळानंतर चवीनुसार यामध्ये काळे मीठ आणि मध घालून प्या.