
फलटण ते बारामती या वर्दळीच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनधारकांना या खड्डय़ांचा मोठा त्रास होत आहे. रात्रीच्या वेळेस खड्डे दिसत नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
फलटण ते बारामती हा 25 किलोमीटर रस्ता प्रचंड वर्दळीचा असून, या रस्त्यावर 24 तास वाहनांची वर्दळ सुरू असते. फलटणवरून बारामती औद्योगिक वसाहत, तसेच विविध कंपन्यांमध्ये कामाला जाणाऱया त्याचप्रमाणे बारामती येथे मोठे शैक्षणिक संकुल असल्याने तेथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दररोज हजारो प्रवासी फलटण ते बारामती आणि बारामती ते फलटण अशी ये-जा करत असतात. मालाच्या खरेदी आणि विक्रीनिमित्तानेही अनेकांची ये-जा सुरू असते. या मार्गावर दिवसभरात 70 अधिक बसची ये-जा सुरू असते.
सतत वर्दळीच्या असणाऱया या रस्त्याची यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली होती. अनेकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. हे काम करताना या रस्त्याची देखभाल करण्याची अट निविदा प्रक्रियांमध्ये टाकण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याची देखभाल करणे संबंधित ठेकेदाराला सक्तीचे होते. मात्र, सद्यःस्थितीत या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी अर्धा ते एक फूट एवढे मोठे खड्डे पडल्याने वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. वर्दळीचा रस्ता असल्याने ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावणे गरजेचे होते. मात्र, ते नसल्याने या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. संबंधित ठेकेदाराने खड्डे बुजवून रस्त्यावर रिफ्लेक्टर लावण्याची मागणी होत आहे.
मी दररोज कामानिमित्ताने बारामतीला ये-जा करीत असतो. फलटण ते बारामती रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेकवेळा वळणावर हे खड्डे दिसत नसल्याने वाहने खड्डय़ांत आपटतात. रात्रीच्या वेळेस वाहतुकीला हा रस्ता धोकादायक झाला आहे. अपघातांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा. – अंशुमन पवार, वाहनचालक.



























































