
ओडिशातील मलकनगिरी जिह्यात ‘आमच्या परवानगीशिवाय मोबाईल फोन वापरू नका’ अशी धमकी माओवाद्यांनी भिंतीवर घोषणा लिहून दिल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
मलकनगिरी जिह्यातील अरापाडर गावातील भिंतीवर सीपीआय (माओवादी) नक्षल्यांनी मोबाईल वापराबाबत मेसेज दिला आहे. अंद्रापाल्ली पंचायत समितीमधील 10 गावांतील रहिवाशांसाठी माओवाद्यांनी मोबाईल वापराबद्दल इशारा दिला आहे.
‘कृपया मोबाईल फोन वापरू नका. कोणालाही आमच्या परवानगीशिवाय फोन कॉल करू नका. जो कोणी परवानगीशिवाय कॉल करील तो आपल्या कृतीला जबाबदार असेल’ अशी धमकी ओडिया भाषेत भितींवर माओवाद्यांनी लिहिली आहे. जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक यू. सी. नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार माओवाद्यांनी दिलेल्या या धमकीची पोलिसांना माहिती असून या मोबाईल वापर बंदीमागील कारणे पोलीस पथक शोधीत आहेत. संशयित माओवाद्यांच्या हालचालींची माहिती सुरक्षा दलाला त्वरित मिळू नये म्हणून माओवाद्यांनी मोबाईल बंदीची धमकी दिली असावी असा पोलिसांचा कयास आहे. यापूर्वी माओवाद्यांनी गावागावात पत्रके वाटुन लोकांना फोन कॉल करू नका असा इशारा दिला होता.

























































