श्रीराम मंदिराचा नकाशा अयोध्या प्रशासनाकडे सादर, प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभारणीसंबंधी प्रशासकीय प्रक्रियांना प्रचंड गती मिळाली आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने प्रशासकीय बाबी वेळीच पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकत शनिवारी अयोध्या विकास प्राधिकरणाकडे मंदिराचा नकाशा सादर केला. मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची चिन्हे आहेत.

तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी भव्य श्रीराममंदिराचा नकाशा तसेच संबंधित इतर कागदपत्रे अयोध्या विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि सचिव नीरज शुक्ला यांच्याकडे सुपूर्द केली. नकाशाला विकास प्राधिकरणाची मंजुरी मिळाली की मंदिराच्या बांधकामाला जलदगतीने सुरुवात केली जाईल, असे रविवारी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने ट्विटद्वारे स्पष्ट केले. देशातील पुरातन आणि पारंपरिक बांधकाम तंत्रांना अनुसरूनच श्रीराम मंदिराची उभारणी केली जाईल. जेणेकरून भूकंप, वादळ वा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तरी मंदिराच्या बांधकामाला धक्का लागणार नाही, असे ट्रस्टने म्हटले आहे.