
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत दि. 24 ऑक्टोबर रोजी संपत असून मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावचे मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. आज माढा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. दरम्यान, बिहारप्रमाणे राज्यात एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊद्या, नेमकी आकडेवारी समोर येईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमात अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा देत एका तरुणाने काळे झेंडे दाखवत अजित पवार यांचा निषेध केला. या घटनेने कार्यक्रम स्थळी खळबळ उडाली.
38 टक्क्यांमध्ये मराठा आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू
राज्यात 62 टक्के आरक्षण आहे. यामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी यांच्यासाठी 52 टक्के, तर ईडब्ल्यूएससाठी 10 टक्के आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा मराठा समाजालाही होत आहे. आता दिलेल्या 62 टक्के आरक्षण सोडून उरलेल्या 38 टक्क्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनातज्ञ अभ्यास करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ते आरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
























































