मराठा क्रांती ठोक मोर्चा मुक्काम रात्रभर परळी तहसीलच्या प्रांगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

राज्य सरकारने अगोदर मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि नंतरच नोकरभरती करावी, असा खणखणीत इशारा परळी येथे काढण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चातून देण्यात आला. मागण्या मान्य होईपर्यंत जागेवरून तसूभरही हलणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलकांनी बुधवारची रात्र परळी तहसीलच्या प्रांगणात घालवली. मुख्यमंत्री कार्यालयातून ठोस निर्णायक लेखी आश्वासन मिळत नाही तोवर मोर्चा विसर्जित होणार नाही, अशी भूमिका घेऊन आंदोलक तहसील परिसरातच ठाण मांडून होते.

मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापुरातून प्रारंभ झाला. त्यानंतर दुसरा मोर्चा बुधवारी परळीत काढण्यात आला. परळीत मोर्चेकरी मागणीवर ठाम राहिले आहेत. बुधवारी दुपारपासून सुरू झालेला पेच मध्यरात्रीपर्यंत कायम होता. त्यामुळे मोर्चा परळी तहसीलच्या प्रांगणात मुक्कामी आहे. मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन येईपर्यंत परळीतील हा मोर्चा संपणार नसल्याची भूमिका सर्वांनी घेतली. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. त्यावर ठोस उत्तर अद्यापिही न मिळाल्याने हा मोर्चा परळीच्या तहसील प्रांगणातच आहे. स्थानीक संयोजकांकडून मोर्चेकऱ्यांसाठी जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ भूमिका जाहीर करून लेखी आश्वासन द्यावे, अशी तीव्र मागणी केली जात आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन त्यांनी पाळले नाही. सरकारने महानोकरभरती करण्याचे जाहीर केले आहे. मात्र आरक्षणच नसल्यामुळे मराठा समाजाला त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे ही नोकरभरती रद्द करण्यात यावी. अगोदर आरक्षण जाहीर करण्यात यावे नंतर नोकरभरती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात नेमलेल्या मंत्री उपसमितीचे प्रमुख महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे चळवळीत फुट पाडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे पुढे मूक मोर्चे काढण्यात येणार नाही, तर आक्रमक आंदोलन करण्यात येईल असे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले. आरक्षणासह कोणत्याही मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची भावना आहे. भविष्यात या संतापाचा उद्रेक झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची राहील, असा इशाराही क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

वेळ पडली तर ठोकून काढणार
या मोर्चाच्या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय आपल्या मागण्यांवर लक्ष वेधले जाणार नाही. त्यामुळेच आता शांततेच्या मार्गाऐवजी आक्रमकतेने उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्तेतील नेते मराठा समाजाचा केवळ वापर करीत आहेत. यापुढे शासनासोबत कसलीच चर्चा होणार नाही. आरक्षण कसे जाहीर करायचे ते आम्ही सरकारला शिकवू. शेतमालाला भाव नाही, समाजातील मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. आता शांत बसायचे नाही, वेळ पडली तर ठोकून काढायची तयारी ठेवू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कीर्तनाचे आयोजन
तहसील प्रांगणात मुक्कामी मराठा क्रांती ठोक मोर्चास्थळी वृंदावन येथील हभप गणेशानंद महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. रात्री १० वाजता हे कीर्तन सुरू झाले. स्थानिक संयोजकांनी मोर्चेकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.