
सामना प्रतिनिधी । मालवण
“जय भवानी, जय शिवाजी….. एक मराठा लाख मराठा”…. अशा गगनभेदी घोषणा देत किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मराठा समाजाच्या कोकण महसूल विभाग मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ सोमवारी सकाळी करण्यात आला.
दरम्यान शेकडो मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांचे पूजन केल्यानंतर किल्ल्यावरून निघालेली ही संवाद यात्रा मालवण शहरातून मोटरसायकल व मोटार रॅलीसह वेंगुर्लेमार्गे सावंतवाडी येथे रवाना झाली.
मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे व अन्य मागण्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्रात मराठा संवाद यात्रा काढण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातुन निघालेल्या संवाद यात्रा २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर धडकणार आहेत. कोकणातील संवाद यात्रेचा शुभारंभ मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गवरून करण्यात आला. आज सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान जिल्हाभरातून आलेले मराठा समाज बांधव बंदर जेटी येथे दाखल झाले. तेथून सर्वजण प्रवासी होडीतून सिंधुदुर्ग किल्ल्यात दाखल झाले. यावेळी जिल्हा समन्वयक सुहास सावंत, अशोक सावंत, बाबा परब, विक्रांत सावंत यांच्यासह तालुका व जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्य महिला ढोल-ताशा पथकाच्या गजराने मालवण शहर व किल्ले सिंधुदुर्ग परिसर दणाणून गेला.
किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करण्यात आली. मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेल्या लढ्याला बळकटी मिळो व शासनाकडून मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण होवोत असे साकडे यावेळी शिवरायांच्या चरणी घालण्यात आले.
यावेळी जिल्हा समन्वयक सुहास सावंत यांनी संवाद यात्रेचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावरून निघालेली ही संवाद यात्रा शहरात दाखल झाली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. बंदर जेटी ते फोवकांडा पिंपळ येथून भरडमार्गे पुन्हा बाजारपेठ येथून फिरत येत कुंभारमाठ येथे दाखल झाली. तेथून ही रॅली सागरी महामार्ग मार्गे वेंगुर्ले येथे रवाना झाली.



























































