
आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आजपर्यंत मराठा समाजाला फसवले आहे. अजूनही चालढकल होत असल्याने, कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने ‘फसवे सरकार चले जाव’ आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचा काळे झेंडे व कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध करण्यात आला.
यापुढे मराठा समाज फसणार नसल्याचा निर्धार करत, चार दिवसांत बैठक घेऊ आणि वेळ पडली तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही जिल्हा बंदी करू, असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाची 28 ऑक्टोबरला बैठक
कोल्हापूर जिह्यातील बारा तालुक्यांतील शहर व ग्रामपातळीवरील सर्व मराठा समन्वयकांची येत्या शनिवारी (दि. 28) सायंकाळी चार वाजता राजर्षी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे बैठक आयोजित केली आहे. करवीरनगरीतून मनोज जरांगेंना पाठिंबा व मराठा आरक्षण आंदोलनाची ठोस भूमिका घेऊन जिह्याच्या एकमुखी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत धरणे आंदोलन, साखळी उपोषण, कॅण्डल मार्च व नेत्यांना गावबंदी याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
पाथर्डीत सदावर्तेंचा पुतळा जाळला
तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळा जाळण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांना अटक करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज पाथर्डी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सदावर्ते यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावेळी उद्धव माने, आप्पासाहेब बोरुडे, विवेक देशमुख, अमोल पाठक, सोमनाथ माने, दीपक मोरे, अंकुश चितळे, लाला शेख, देवा पवार, मेजर मोरे यांच्यासह मराठा तरुण उपस्थित होते.
वडूजमध्ये महिला सदस्याचा राजीनामा
मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने चालू आहेत. मराठा आंदोलनाची धग सातारा जिह्यात दूरवर पसरली असून, अनेक ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे. दरम्यान, खटाव तालुक्यातील कन्हेरवाडी गावच्या महिलेने ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला.



























































