
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
मराठा आरक्षणासंदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूरात दसरा चौक येथे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची तब्बल चाळीसाव्या दिवशी कोंडी फुटली आहे. आंदोलकांसोबत शिष्टाई करण्यात मंत्रिगट उपसमितीला यश आले आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या 22 मुद्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे लेखी आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
कसबा बावडा येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या ‘लक्ष्मीविलास पॅलेस’ या जन्मस्थळी शनिवारी सायंकाळी ही बैठक झाली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुजीत मिणचेकर, आमदार अमल महाडिक,शिवसेना नेते, सकल मराठा समाजातील समन्वयक दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, सचिन तोडकर, वसंत मुळिक आदि यावेळी उपस्थित होते.
या बैठकीनंतर आंदोलकांनी बोलताना, आमचा सरकारवर विश्वास नाही. मात्र, आपण शाहु जन्मस्थळी येऊन शाहु महाराजांच्या वारसांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन दिल्याने,1 डिसेंबरपर्यंत हे आंदोलन स्थगीत करत असल्याचे सांगीतले आहे. मात्र 1 डिसेंबर नंतरही सरकारने आरक्षण देण्यास चालढकल केली, तर सरकार विरोधात मुंबईत वाहनमोर्चा काढण्यात येईल आणि आंदोलन यापेक्षाही अधीक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे.



























































