मराठ्यांच्या ताकदीपुढे सरकारला शरण यावेच लागेल! नांदेड जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या दणदणीत सभा

आता या क्षणापासून आरक्षणाच्या विषयावर राज्यातील गावे पिंजून काढा. आरक्षणाबद्दल प्रबोधन करा. मराठ्यांच्या ताकदीपुढे सरकारला शरण यावेच लागेल असा स्पष्ट इशारा देतानाच मनोज जरांगे पाटील यांनी जातींमध्ये कलह निर्माण करून भावना भडकावण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी मंडळी करत आहेत, असा आरोप केला. त्यांचे प्रयत्न त्यांना लखलाभ असोत. पण आपण मात्र शांततेचा मार्ग सोडायचा नाही, हा मार्गच मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नांदेड जिल्ह्यात बारड, मुसलमानवाडी पाटी, मारतळा तसेच नायगाव येथे शुक्रवारी मनोज जरांगे यांच्या दणदणीत सभा झाल्या. या सभेत त्यांनी सुरुवातीलाच आरक्षण धोरणावरून सरकारला खडे बोल सुनावले. आतापर्यंत 35 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सत्तर वर्षांपूर्वीच्या या नोंदी आहेत. असे असतानाही आमच्या आरक्षणात कोणी अडथळा आणला, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. आरक्षणाचा आधार नसल्यामुळे अनेक मराठा तरुण आत्महत्या करत, असून त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी केला.

अधिवेशनात आरक्षण देणारा कायदा करा
सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कोण मराठा आरक्षणावर बोलतो, याकडे बारकाईने लक्ष ठेवा. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देणारा कायदा या अधिवेशनात करा मराठा समाज तुमचा सन्मान करेल, असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणावर सभागृहात बोलला नाहीत तर मराठे तुम्हाला कदापि माफ करणार नाहीत, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

वेळ येईल तेव्हा तुम्हाला बघून घेऊ
आमच्या आरक्षणावर जगलात आणि आता आमच्याच आरक्षणाला विरोध करता. वेळ येईल तेव्हा तुम्हाला बघून घेऊ, असा पलटवार मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला. आता कितीही ओरडून विरोध केला तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, उगाच आमच्या नादाला लागू नका, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना सुनावले.

आरक्षण मिळाल्याशिवाय घरी जाणार नाही
भाषणाच्या अखेरीस मनोज जरांगे हे भावूक झाले. चार महिने झाले मराठा आरक्षणासाठी घराबाहेर आहे. आता प्राण गेला तरी बेहत्तर पण मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय घराच्या उंबऱ्याला स्पर्श करणार नाही, असे जरांगे म्हणाले.

17 डिसेंबरला महत्वाची बैठक
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंतरवाली सराटी येथे 17 डिसेंबर रोजी अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातून मराठा कार्यकर्ते येणार आहेत. आतापर्यंत सापडलेल्या नोंदी, सरकारने मराठा आरक्षणावर काय केले याचा सांगोपांग अभ्यास करून पुढील रूपरेषा ठरवली जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली.