
मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली असताना त्यांच्या समर्थनार्थ गावागावांत उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्याच वेळी राज्यात आंदोलनाचा वणवा भडकला आहे. मराठवाडय़ात आंदोलन चिघळले असून दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांमुळे तणावाचे वातावरण आहे. एसटी सेवा ठप्प झाली आहे. धाराशीवमध्ये रविवारी मुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले तर जळगावात मंत्र्यांचा ताफा रोखण्यात आला. जालन्यात संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची गाडी पह्डली.
मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन पेटू लागले आहे. बीडमध्ये शनिवारी मध्यरात्री एक बस पेटविण्यात आली तर एक बस जाळण्याचा प्रयत्न झाला. रविवारी सकाळी एक बस पह्डण्यात आली. या घटनेनंतर बीड जिह्यातील बस वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली. बसस्थानकामध्ये प्रवाशांची तोबा गर्दी झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी वडवणीत आंदोलनकर्त्यांनी टॉवरवर चढून उपोषण सुरू केले तर गावागावांमध्ये पॅण्डल मार्च निघू लागले आहेत. आंदोलनकर्त्यांनी बीड-गेवराई रस्त्यावर टायर जाळले.
रविवारी सकाळी चऱ्हाटा फाटा येथे पुण्याला जाणाऱ्या एका बसवर दगडफेक करण्यात आली. सुरक्षेची खबरदारी म्हणून बीड जिल्हा विभागीय नियंत्रकांनी बीडमधील बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बससेवा अचानक बंद झाल्याने बसस्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली. रविवारी सकाळपासूनच बीड बायपासवर मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी ‘चक्का जाम’ करत वाहतूक ठप्प केली. बीड-गेवराई मार्गावर पाडळसिंगीच्या पुलावरही ‘रास्ता रोको’ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणास आज रविवारी शिक्षकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. वडवणी येथे आंदोलनकर्त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. वडवणीत पुढाऱयांना गावबंदी करण्यात आली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले. जिह्यातील बहुतांशी गावांमध्ये पॅण्डल मार्च काढण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले
धाराशीव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर शारदीय नवरात्री महोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या बॅनरवरील पह्टोंना काळे फासण्यात आले. भूम आणि वाशी तालुक्यांत एसटी बसवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या पह्टोंवर शाई फेकून निषेध व्यक्त करण्यात आला.
ठाण्यात सुनील तटकरे यांना दाखवले काळे झेंडे
मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाला बसलेले ठाण्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज ठाण्यात येताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निषेध केला.
खासदार हेमंत पाटील यांची राजीनाम्याची स्टंटबाजी
आंदोलकांनी राजीनाम्याची मागणी करताच मिंधे गटाचे गद्दार खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची स्टंटबाजी केली. गावबंदी असताना गद्दार खासदार हेमंत पाटील हिंगोलीत आले. लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा देण्याची प्रथा असताना पाटील यांनी आंदोलकांकडे राजीनामा देऊन स्टंटबाजी केल्याची चर्चा रंगली.
महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार
मनोज जरांगे पाटील यांना दिलेले आश्वासन राज्य सरकारने पूर्ण न केल्याने त्यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे आणि त्यांची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांच्या न्याय्य हक्काचे आरक्षण देण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहे. आतापर्यंत अनेक बैठका झाल्या, समित्या झाल्या, पण निर्णय झाला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने यावर निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी राज्यपालांना करण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज राजभवन येथे जाऊन राज्यपाल बैस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना एक निवेदन दिले. मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे परिस्थिती हळूहळू बिघडत चालली आहे. मराठा तरुण आत्महत्या करत आहेत. त्यानंतरही आरक्षणासाठी राज्य सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत, असे या निवेदनाद्वारे राज्यपालांना कळवण्यात आल्याची माहिती या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी दिली.
जरांगे पाटलांनी दोन घोट पाणी घेतले
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. असे असतानाही ते वैद्यकीय उपचार घेण्यास तयार नाहीत. बोलताना त्यांना धाप लागत आहे. त्यामुळे त्यांनी किमान पाणी तरी घ्यावे असा आग्रह आज आंदोलकांनी केला. एका अंध कार्यकर्त्याने तर ढसाढसा रडून त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. अखेर जरांगे पाटील यांनी सर्वांचा मान राखत पाण्याचा घोट घेतला. परंतु, आता पाणी पितोय, नंतर पिणार नाही असे सांगत उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी जाहीर केले.

































































