
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन उभे केले, तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ ओबीसींच्या हक्काचे आरक्षण कोणाला देऊ नये यासाठी सभांवर सभा घेत आहेत. जालन्यातील अंबड येथे झालेल्या सभेत त्यांनी जरांगे-पाटील यांच्यावर टीकाही केली. या सभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही सहभागी झाले होते. मात्र, या सभेनंतर त्यांनी छगन भुजबळ यांच्या टोकाच्या भूमिकेला आपले समर्थन नसल्याचे म्हटले आहे.
सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आपला हक्का मांडताना टोकाची भूमिका घेऊन दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल याला माझे समर्थन नाही. ओबीसींच्या हक्का, न्यायासाठी आम्ही लढणार. पण दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल, दरी निर्माण होईल, दोन गट पडतील अशा प्रकारची टोकाची भूमिका कोणी मांडत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि त्या भूमिकेला आम्ही समर्थन देणार नाही.
छगन भुजबळ यांच्यावर भाजपचा दबाव आहे का? असे विचारले असता वडेट्टीवार म्हणाले की, मला त्याबाबत माहिती नाही. पण आता मोठ्या प्रमाणात दाखले देऊन झाले आहेत. साप निघून गेला अन् लाठी थोपटत बसायचे असा हा प्रकार सुरू झालाय. तुमची भूमिका मांडताना एकदम हिमनगाच्या सर्वोच्च टोकासारखी कशी मांडणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये. गावा-गावात वाद झाले भांडण झाले तर कोण जबाबदार असेल? शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे, मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे. छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले त्याला माझे समर्थन नाही, असे वनडेट्टीवीर म्हणाले.
समाजाची बाजू मांडताना कोणीही टोकाची भूमिका मांडू नये. गावा-गावात वाद झाले भांडण झाले तर कोण जबाबदार असेल?
शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे, मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीने टोकाचे विधान केले… pic.twitter.com/5WNHBobn50
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 20, 2023
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात अशी दरी कधीही निर्माण झालेली नाही. भुजबळ सत्तेत आहेत. सत्तेत असताना समस्या सोडवल्या पाहिजे. सत्तेत असून ओबीसी समाजाच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे.