प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
सगे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या दुसऱया दिवशी त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांनी वैद्यकीय तपासणी नाकारत मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे सरकारला ठणकावले आहे.
सगे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून त्याची अंमलबजावणी करा, हा कायदा बनण्यासाठी दोन दिवसांत विशेष अधिवेशन घ्या, 57 लाख नोंदी सापडलेल्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या, त्यांच्या नातेवाईकांना शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्या, नोंदी सापडलेल्यांच्या याद्या ग्रामपंचायतीवर लावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, हैदराबाद, बॉम्बे गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरा, शिंदे समितीला एका वर्षाची मुदतवाढ द्या, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करा व त्याची अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी काल शनिवारपासून उपोषण सुरू केले आहे.
हरिभाऊ राठोडांनाही भेट नाकारली
जरांगे पाटलांना पाठिंबा देत मराठय़ांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची भूमिका आहे. त्यामुळे आज ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला आले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव मनोज जरांगे यांनी त्यांना भेट नाकारली. मात्र, सरपंच पांडुरंग तारख व इतरांशी चर्चा करून राठोड यांनी जरांगे यांना शुभेच्छा दिल्या.
50 विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू
शनिवारपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला फेलोशिपपासून वंचित 50विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. फेलोशिप मिळावी, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आज रविवार, 11 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिह्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
उपचार घेण्यास नकार
चार दिवस रात्रंदिवस दौरा आणि कालपासून उपोषणास बसल्यामुळे ते आज दिवसभर पूर्णवेळ झोपून आहेत. घशातील त्रासामुळे त्यांनी आज पत्रकारांशीही संवाद साधला नाही. आरोग्यपथक उपचारासाठी आले असता त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. सरकारकडून काल अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी उपचार सुरू ठेवावे म्हणून विनंती केली होती.
14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक
सगेसोयऱयांची व्याख्या स्पष्ट करून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राण गेला तरी मागे हटणार नाही. एका जिवापेक्षा करोडो जीव महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. या आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा समाजाने सरकारच्या निषेधार्थ 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.