
सामना प्रतिनिधी । प्रतिनिधी
शासन आरक्षण जाहीर करीत नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही, अशी घोषणा करीत मोर्चेकऱ्यांनी परळी तहसील कार्यालयासमोर ठाण मांडले. बुधवारी सकाळी ११ वाजता मराठा क्रांतीचा ‘ठोक मोर्चा’ परळीत काढण्यात आला. लाखोंच्या संख्याने आलेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला आहे. यापूर्वी काढण्यात आलेले ५८ मोर्चे हे मूकमोर्चे होते. तुळजापूर नंतर परळीत हा दुसरा ठोक मोर्चा काढण्यात आला आहे.
या मोर्चात राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असून, आरक्षणाच्या मागणीसह सरकारने जाहीर केलेली नोकरभरती रद्द करावी अशी तीव्र मागणी आहे. दुपारच्या उन्हातही मोर्चेकरी परळीच्या तहसील समोरून हलायला तयार नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची शिष्टमंडळाशी उशीरापर्यंत आरक्षणाबाबत चर्चा सुरू होती.
या मोर्चाच्या माध्यमातून थेट राज्य सरकारला आव्हान देण्यात आले असून, आरक्षण मिळेपर्यंत परळी न सोडण्याचा निश्चय मोर्चेकऱ्यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी या मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा आता तहसील कार्यालयासमोरच आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून मराठा बांधव परळीत दाखल झाले आहेत.
























































