रंगपट – कलाक्षेत्रात स्वतःला घडवताना…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनय प्रवासाच्या वळणावरची हृदयस्पर्शी आठवण जागवत आहे अभिनेता मिलिंद शिंदे…

>> राज चिंचणकर

माझे वडील शासकीय अधिकारी होते आणि त्यांची इच्छा होती की मी पण ‘यूपीएससी’ करावे. पण मी हट्टाने दिल्लीला ‘एनएसडी’ला गेलो आणि नंतर पुण्याला ‘एफटीआय’ला शिकलो. त्या संस्थांतून मोठमोठी माणसे पास झाली असली तरी माझेही तसेच काही होईल, अशी शक्यता वडिलांना वाटत नव्हती. यातून मला नोकरी वगैरे मिळणार का, असा मध्यमवर्गीय विचारही माझ्या मनात होता.

मला वडील म्हणायचे की, अजूनही तुझे वय आहे, तू अजून ‘यूपीएससी’ करू शकतोस वगैरे. त्यांच्या बोलण्यामुळे मलाही वाटायला लागले की, आपला मार्ग चुकलेला आहे. 1995-96 च्या काळात चांगले बलदंड, गोरेगोमटे अशा माणसांची कलाक्षेत्रात चलती होती. मी तर नगरहून आलेला साधा मुलगा. माझी पंबर 28 इंचांची आणि मान 3 इंचांची. आपण कुठेच काही तसे दिसत नाही, असे मला वाटायचे. फ्रस्ट्रेशन येत होते. जरी या क्षेत्रात आपल्याला काम मिळाले तरी आपल्या वाटय़ाला सिक्युरिटी गार्ड, पोस्टमन, रामा गडी, मुख्य गुंडाच्या पाठीमागे उभा राहणारा त्याचा पंटर वगैरे पद्धतीच्या भूमिका येतील असे मला वाटले. मला हळूहळू आकलन व्हायला लागले की, आपले फारसे काही भविष्य इथे दिसत नाही. कला वगैरे आपल्या काही कामाची नाही.

त्यावेळी ‘उषाकिरण टेलिव्हिजन’ नावाचे चॅनल आले होते. तिथे मी प्रोडय़ुसर, फ्लोअर मॅनेजर आणि दिग्दर्शक पदासाठी तीन मुलाखती दिल्या. मला वाटत होते की, मी खूप ओव्हर क्वालिफाइड आहे. त्यांनी पगाराबद्दल विचारले तेव्हा त्यावेळेची माझी कुवत ओढूनताणून मी पंधरा हजार रुपये महिना असे म्हटले. त्यावर त्यांनी अडीच हजार रुपये महिना देऊ, असे सांगितले. तेव्हा मला कळले की, दोन डिग्य्रांची किंमत अडीच हजार रुपये आहे. मग मी ठरवले की, वडील म्हणतात त्याप्रमाणे आपण ‘यूपीएससी’ करावे.

त्याचदिवशी संध्याकाळी मी घरी पह्न केला तेव्हा मला सांगण्यात आले की, अमृता सुभाषचा पह्न आला होता. तिने मला वामन पेंद्रे यांना भेटायला सांगितले होते. वामन पेंद्रेंचा नंबर शोधून पह्न झाल्यावर त्यांनी मला भूपेश गुप्ता भवन येथे भेटण्यास बोलावले. आता भूपेश गुप्ता भवन म्हणजे काय हेच मला माहीत नव्हते. चौकशी केल्यावर सिद्धिविनायकच्या जवळ असे समजले, पण सिद्धिविनायकही मला माहीत नव्हते. कारण मी मुंबईला पहिल्यांदाच आलो होतो. विचारपूस करता ते दादर (वेस्ट)ला आहे असे कळले. त्यावेळी मी तिकीट मागतानासुद्धा ‘दादर (वेस्ट)’ असेच मागितले होते, तर वामन पेंद्रेंनी माझी ऑडिशन घेतली. त्या नाटकाच्या प्रयोगाला गजेंद्र अहिरे आला होता आणि त्यातून त्याने मला त्याच्या ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या सिनेमात भूमिका दिली. या पहिल्याच भूमिकेसाठी मला अवॉर्डही मिळाले.

या सिनेमाच्या पुण्यातल्या शोला माझे वडील आले होते. सिनेमा संपल्यानंतर रसिक जेव्हा माझ्या सह्या घेत होते तेव्हा पार्ंकगमध्ये उभ्या असलेल्या वडिलांकडे मी सहज बघितले तर त्यांच्या डोळय़ांत पाणी होते. या सगळय़ा प्रवासाच्या दरम्यान माझे वडिलांसोबत काहीच बोलणे झाले नव्हते, पण त्या दिवसापासून आम्ही पुन्हा एकमेकांशी बोलायला लागलो. नंतर वडिलांनीच मला एकदा सांगितले की, आता लोक त्यांना मिलिंद शिंदेचे वडील म्हणून ओळखायला लागले आहेत. त्याआधी त्यांचा जो काही आग्रह होता तोसुद्धा योग्य होता हे मला मी वडील बनल्यानंतर समजले. पण बहुतांश कलाकारांची गोष्ट अशीच आहे की, जिकडे विरोध आहे तिथूनच तो कलाकार पुढे निघून येतो. त्या दिवशी माझ्या वडिलांच्या डोळय़ांत मला सर्व काही दिसले. मधल्या काळात आमच्यात जे झाले होते ते त्यांच्या अश्रूंमध्ये मी पाहिले. माझ्यासाठी तो अतिशय हृदयस्पर्शी क्षण होता.