
दलित, उपेक्षित समाजाच्या व्यथावेदना आणि तरुण पिढीच्या अव्यक्त महत्त्वाकांक्षांचे भावस्पर्शी चित्रण करून ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ उभे करणारे तसेच साहित्य विश्वात नवा प्रवाह निर्माण करणारे ज्येष्ठ लेखक माधव कोंडविलकर यांचे शनिवारी रत्नागिरी येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वंचितांचा लेखक आणि सच्चा कार्यकर्ता हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे.
माधव कोंडविलकर यांनी मुंबई आणि कोकणातील पीडित, कामगार वर्गाची होरपळ लेखनातून तीव्रपणे मांडली. ते रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरात राहत. कोंडविलकर गेले काही दिवस आजारी होते. त्यांना रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.
‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ ही त्यांची गाजलेली कादंबरी होय. हे बोलीभाषेतील रोजनिशी स्वरूपातील लेखन होते. त्याचे पुनर्लेखन करून त्यांनी कादंबरी केली. ती 1977 साली तन्मय दिवाळी अंकात छापून आली. 1979 साली त्यांच्या पत्नी उषा कोंडविलकर यांनी कन्या ग्लोरीयाच्या नावाने तिचे प्रकाशन केले. 87 साली त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. या लेखनाने मराठी साहित्य क्षेत्रात खळबळ उडवली.
पेशाने शिक्षक असलेल्या कोंडविलकरांनी ‘एक गाव एक पाणवठा’, ‘दलित चळवळ’, ‘दलित साहित्य चळवळ’ यांत सक्रिय सहभाग घेतला आहे. राजापूर तालुक्यातील अनेक गावांत पायपीट करून समाज परिवर्तनाचे काम केले.
दलित आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणून ‘देवाचे गोठणे’ला गौरवाचे स्थान लाभले. त्याला ‘वेदनांचे वेद’ हे विशेषण बहाल केले गेले. ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ चा फ्रेंच व हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाला. हे पुस्तक व यातील काही उतारे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक राज्यांत शाळा व महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांमध्ये लावण्यात आले. कोंडविलकरांच्या काही कथांचे व कवितांचे फ्रेंच, इंग्लिश, हिंदी,तमिळ, उर्दू भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
साहित्यसंपदा
अजून उजाडायचं आहे (कादंबरी), आता उजाडेल! (कादंबरी), एक होती कातळवाडी (कादंबरी), घालीन लोटांगण (धार्मिक), डाळं (कादंबरी), देवांचा प्रिय प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक (ऐतिहासिक), निर्मळ (कादंबरी), भूमिपुत्र (कादंबरी), मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (दलित साहित्य), स्वामी स्वरूपानंद (आध्यात्मिक), हाताची घडी तोंडावर बोट (कादंबरी), देवदासी, कोंगवन (शोधग्रंथ), ईटुकलेराक, छान छान गोष्टी (बालवाङ्मय), वेदनांचे वेद
























































