
सरकारी कामकाजात मराठी भाषेचा वापर करताना राज्यातील गावांच्या मूळ मराठी नावांचा उल्लेख होणार आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या कामकाजात यापुढे बांद्रा नावाऐवजी वांद्रे आणि सायनऐवजी शीव हे मूळ नाव वापरले जाणार आहे. त्याबाबतचे आज आदेश या विभागाने जारी केले आहेत. मुख्य म्हणजे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या विभागीय परीक्षा व स्पर्धा परीक्षा मराठी भाषेतून घेण्याचे निर्देशही प्रथमच जारी झाले आहेत.
शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळातील मराठी भाषा समितीने शिफारशी केल्या होत्या. सरकारी कामकाजात मराठी भाषेचा वापर कसा होतो यावर लक्ष ठेवण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागाने जारी केल्या होत्या. त्यानुसार शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याच्या दृष्टीने राज्याच्या ग्रामविकास विभागाने मराठी भाषेचा वापर करण्याच्या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱयांना सूचना केल्या आहेत.
शासकीय फलक मराठीत
शासकीय कार्यालयातील पाटय़ा-फलक मराठीत असावेत. टिप्पणी, आदेश, शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना व इतर पत्रव्यवहार मराठी भाषेत करावा लागणार आहे.
निमंत्रण पत्रिका
ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रापपंचायती व इतर कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱया समारंभाची निमंत्रण पत्रिका मराठी भाषेत असाव्यात, मात्र क्वचितप्रसंगी इंग्रजी भाषेत असाव्यात असे स्पष्टपणे नमूद केले आहे.





























































