
गिरगाव चौपाटी येथील हजारीमल सोमाणी महाविद्यालयाकडून कला शाखेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका दिल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून यापुढे कला शाखेच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे केली आहे.
मुंबई विद्यापीठाकडून मराठी व इंग्रजी भाषेतून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र कला शाखेच्या बऱयाच विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका लिहिण्याची भाषा मराठी असतानाही त्यांना हजारीमल सोमाणी महाविद्यालयात इंग्रजी भाषेतील प्रश्नत्रिका दिल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना येणाऱया अडचणींची दखल घेत युवासेना सहसचिव संतोष धोत्रे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे, ऍड. वैभव थोरात यांनी कुलसचिवांची भेट घेत कला शाखेच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका द्यावी, या मागणीचे निवेदन दिले.

























































