
जगभरातील साहित्य वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या जयपूर साहित्य महोत्सव 2026 ला नुकतीच जयपूर येथे सुरुवात झाली. 15 ते 19 जानेवारी या कालावधीत पार पडत आहे. महोत्सवाचे हे १९ वे वर्ष असून यंदा सुमारे ५०० वक्ते सहभागी होत आहेत. लेखक, विचारवंत, तज्ज्ञ यांची व्याख्याने, संभाषण सत्र विशेष आकर्षण असतात. विविध देशांच्या व प्रदेशांच्या भाषा, संस्कृती आणि विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारी एकूण २६६ सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
या लिट फेस्ट ला तरुणवर्गाची लक्षणीय उपस्थिती दिसते. यंदाही ती दिसून आली. आजच्या संभाषण सत्रात कॉमेडियन वीर दास यांचे सत्र फारच रंगले. आजचा दिवस विविध कारणांनी महत्त्वाचा ठरला. राजकीय, सामाजिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक मुद्द्यांवर दिवसभर अनेक प्रमुख सत्रे आयोजित करण्यात आली होती. लेखिका आणि इन्फोसिसच्या सह-संस्थापक सुधा मूर्ती यांनी त्यांच्या “द मॅजिक ऑफ द लॉस्ट इअरिंग” वर चर्चा केली. गाझा हत्याकांड, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि साहित्यविश्व, राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावरकर आणि जिना, दिल्लीतील खाद्यसंस्कृती, लक्ष्मी पुरी यांचे स्त्रीवाद वरील विश्लेषण, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांचे व्याख्यान, ऋतुजा दिवेकर यांची मिताहार संकल्पना, कॉमेडियन वीर दास याची आउटसाइडर: अ मेमोयर ऑफ मिसफिट्स या पुस्तकावर चर्चा अशा विविध विषयावरील सत्रे आयोजित करण्यात आली होती. मराठी प्रकाशन विश्वाची महत्त्वपूर्ण ओळख जयपूर बुकमार्क या मंचावर करून देण्यात आली. यात पॉप्युलर प्रकाशनच्या 100 वर्षांचा आढावा हर्ष भटकळ यांनी घेतला. तर प्रकाशन व्यवसायातील वैभवशाली परंपरा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर, ज्योस्त्ना प्रकाशनचे विकास परांजपे, भाषा विभागाचे अध्यक्ष किरण कुलकर्णी, सकाळ प्रकाशनचे आशुतोष रामगिर आणि हर्ष भटकळ यांच्या चर्चेतून मराठी भाषेचा अभिजाततेचा व्यापक प्रवासही मांडला गेला. वाचक – लेखक व साहित्य – संस्कृती प्रेमींना पर्वणी ठरणारा असा हा उत्सव जागतिक विचारांना दिशा देणारे एक प्रबळ व्यासपीठ ठरणार आहे.






























































