
संमेलनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी रविवारी, 5 डिसेंबर रोजी पाच परिसंवाद रंगणार आहेत. त्याचबरोबर बालकुमारांच्या साहित्य मेळाव्यातही भरगच्च साहित्यिक मेजवानी राहणार आहे. समारोप सोहळा दुपारी 4 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. समारोपानंतर रात्री 8 वाजता ‘जय जय माय मराठी’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून माय मराठीचा महाजागर करण्यात येईल.
कविवर्य कुसुमाग्रजनगरीतील मुख्य मंडपात रविवारी सकाळी 9.30 वाजता ‘शेतकऱयांची दुःस्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयपणा, लेखक, कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका’ या परिसंवादात राज्यमंत्री बच्चू कडू, रमेश जाधव, संजय आवटे, शेषराव मोहिते, श्रीमंत माने, निशिकांत भालेराव, विलास शिंदे, शैलेंद्र तनपुरे सहभागी होतील. अध्यक्षस्थान ज्येष्ठ लेखक भास्कर चंदनशिव भूषवणार आहेत. दुपारी 1.30 वाजता ‘वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण’ हा परिसंवाद होईल. त्याचे अध्यक्ष गिरीष कुबेर असून, जयदेव डोळे, विश्वंभर चौधरी, अपर्णा वेलणकर, डॉ. हरी नरके सहभागी होतील.
फार्मसी इमारतीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता ‘ऑनलाइन वाचन-वाङ्मय विकासाला तारक की मारक?’ परिसंवाद प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.


























































