ऑक्सफर्डचे हिंदुस्थानी शब्दभांडार! शब्दांची देवाणघेवाण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता वारणकर

शब्दकोशाचा उपयोग हा केवळ संशोधनासाठी किंवा अध्ययनासाठी होतो, मात्र सर्वसामान्य माणूस कधीच शब्दकोश वापरत नाही तसेच संदर्भ म्हणून शब्दकोशाचा वापर करत नाही याचं कारण असं की, शब्दकोशाची गरज सर्वसामान्य माणसाला भासत नाही. कारण तो शब्दकोशाची भाषा व्यवहारात वापरत नाही. उदाहरणार्थ रेल्वे स्थानक आणि रेल्वे सिग्नल याला पर्यायी शब्द जे आहेत ते असे आहेत की, जे व्यवहार्य नाहीत. सामान्य माणसाला देवाणघेवाणीसाठी चालू चलन लागतं तसेच भाषेद्वारे संपर्क साधण्यासाठी शब्दांची देवाणघेवाणही महत्त्वाची आहे. त्यासाठी व्यवहारातला शब्दकोश वेगळा असतो आणि शब्दकोशातली माहिती वेगळी असते.

एखाद्या अडलेल्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी डिक्शनरी अर्थात शब्दकोशाचा आधार मोलाचा वाटतो… शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी, शब्दांचा योग्य अर्थ समजून घेण्यासाठी, नवनवीन शब्दांचे अर्थ कळण्यासाठी शब्दकोशाची मदत होते. यामुळे ज्ञान, माहितीत भर पडते. बाजारात अनेक प्रकारचे शब्दकोश उपलब्ध आहेत… शब्दांचा जगन्मान्य खजिना म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऑक्सफर्ड या शब्दकोशातही सध्या मराठी-हिंदी भाषेतील फंटूश, चड्डी या दोन नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. गुलाबजाम, वडा, महाराजा, मंत्र, गुरु यासारखे प्रचलित शब्द ऑक्सफर्डच्या शब्दकोशात आधीच आहेत.

ऑक्सफर्डमध्ये हिंदुस्थानी शब्द आजही कमी आहेत यावर ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे सांगतात, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कुठल्याही भाषेचा विकास हा त्या भाषेतील शब्द जेवढे लोकप्रिय होतील किंवा व्यवहारात रुळतील त्याच्यावर अवलंबून असतो. उदा. संस्कृत ही ज्ञानभाषा आहे, मात्र ती व्यवहाराची भाषा झाली नाही त्यामुळे संस्कृत भाषा ही सांस्कृतिक अवशेष रुपाने उरली. कुठलीही भाषा ही फक्त ज्ञानभाषा असून उपयोग नाही तर ती रोजच्या बोलण्यातली भाषा असावी लागते. तिच्यातले शब्द दैनंदिन बोलीभाषेत रुढ व्हावे लागतात. तेव्हा त्या शब्दांचे महत्त्व वाढते.

शब्दकोश पाहण्याची प्रत्येकाने लावून घ्यायला हवी, मात्र अलिकडच्या काळात शब्दकोशातले अर्थ हे केवळ पारंपरिक अर्थ आहेत. आपण आजच्या काळात परंपरागत अर्थांच्या ऐवजी प्रचलित किंवा समकालीन अर्थाच्या शोधात असतो. शब्दकोश जितका अधिकाधिक ताजातवाना होईल, समकालीन होईल तितका त्याचा प्रसार वाढेल. कुठलाही शब्द हा जर व्यवहारात रुळला नाही तर तो शब्द केवळ कोशातच राहतो. उदा. ‘अग्निरथपथविश्रामधाम’ म्हणजे रेल्वे स्थानक. हा शब्द व्यवहारात अजिबात रुळलेला नाही किंवा ‘अग्निरथपथ आवक जावक लंबक दर्शक पट्टिका’ म्हणजे रेल्वे सिग्नल. आता हे शब्द कधीच व्यवहारात रुळले नाहीत त्यामुळे ते कोशातच राहिले. जे शब्द व्यवहारात रुळत नाहीत ते शब्द वस्तुसंग्रहालयात एखादी वस्तू ठेवावी त्या पद्धतीने राहतात. त्याचा वापरच होत नाही. कोशातल्या सगळ्याच शब्दांचा वापर होतो असं नाही. त्यामुळे आपण म्हणतो एखादा माणूस कोशात गेला म्हणजे त्याचा वापर व्यवहारात राहिला नाही. तसेच शब्दांच्या बाबतीत असते.

आपल्याकडे शब्दकोशाची कमतरता जाणवते का, यावर त्यांचे म्हणणे आहे की, आज भाषेचं स्वरुप खूप व्यापक झालंय. ज्यावेळी ज्ञानभाषा ही व्यवहाराची भाषा झाल्यानंतर तिला एक वेगळा अर्थ प्राप्त होऊ लागतो. त्याप्रमाणे जेव्हा आपल्याकडे शब्दकोशाचा वापर मोठय़ा प्रमाणात होईल त्यावेळी माणसं अधिकाधिक परंपरागत म्हणजे पूर्वीपासून रुढ असलेल्या शब्दांचा वापर करू लागतील.

हिंदुस्थानी शब्द जगभरात
हिंदुस्थानी शब्द असेही जगभरात पोहोचले आहेत, ऑक्सफर्डमुळे वेगळा कसा फरक पडेल असे विचारता ते सांगतात, ऑक्सफर्ड हे हिंदुस्थानी शब्द जगभरात पोहोचवण्याचे अतिशय उत्तम असे साधन आहे. जे शब्द आधी व्यवहारात रुळणं गरजेचं आहे. तो व्यवहार आधी राज्य, राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असेल . उदाहरणार्थ ‘चाय’ हा शब्द ऑक्सफर्डद्वारे जगभरात पोहोचला त्याचं कारण हा शब्द रोजच्या वापरातला शब्द झाला. त्यामुळे ऑक्सफर्डनेदेखील त्याची दखल घेतली. अमेरिकेत ऍशमिल नावाचं ठिकाण आहे तेथे चायकम आणि पानीकमसारखे शब्द वापरले जातात. चायकम नावाचं हॉटेल आहे. ऍशमिलमध्ये ‘चायकम’ हे हॉटेल असावं याचं कारण हा शब्द रोजच्या वापरात रुढ झाला हे आहे.

[email protected]