दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या पाठिशी शिवसेना खंबीर, उद्धव ठाकरे देणार मदतीचा हात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

राज्यात भीषण दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला सोसाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांची होरपळ सुरू आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. लातूर, बीड, जालना या तीन जिल्ह्यामध्ये त्यांच्या हस्ते 100 ट्रक पशुचाऱ्याचे वाटप केले जाणार आहे. तर दुष्काळी भागाची शिवसेनेच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू आहे. गरज भासल्यास गावागावात टँकर आणि सामूहिक विवाह सोहळे शिवसेनेच्या वतीने राबवले जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीडमध्ये दिली.

ramdas-kadam-pc

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी 9 जानेवारी रोजी बीडमध्ये येत आहेत. त्या अनुषंगाने शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री भाई रामदास कदम यांनी पत्रकारांना माहिती देताना असे म्हटले, मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील जनतेच्या पाठीशी उभे राहाण्याचे काम शिवसेनेने सुरू केले आहे. शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. बाकी सर्व कामे बाजूला ठेवून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शासनाच्या माध्यमातून उपाययोजना सुरू राहिल. समांतर उपाययोजना आता शिवसेना राबवणार आहे. शासनाएवढेच काम शिवसेनेने हाती घेतले आहे. मदतीचा यज्ञ 9 जानेवारीपासून सुरू होत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जानेवारी रोजी बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत. ग्रामिण भागामध्ये दुष्काळाची पाहणी ते करणार आहेत. दुष्काळग्रस्त जनतेशी संवाद साधणार आहेत. भाषण करण्यापेक्षा कृतीतून काम सुरू केले आहे. 100 ट्रक पशु खाद्य वाटप केले जाणार आहे. त्यातील 30 टन पशुखाद्य बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे.

तसेच शिवसेनेच्या वतीने दुष्काळी गावाचा सर्व्हे केला जात आहे. ज्या गावामध्ये शासनाचे टँकर पोहचत नाहीत, पाणी परिस्थिती गंभीर आहे अशा गावांमध्ये शिवसेनेचे टँकर दिमतीला असणार आहे. जनतेला पाणी भरून ठेवण्यासाठी तब्बल एक हजार टाक्याचे वाटप केले जाणार आहे. गरज भासल्यास सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे. यापूर्वीही शिवसेनेने दुष्काळ परिस्थितीत दोन हजार विवाह लावून देण्याचे काम केले आहे. तर 27 हजार दुष्काळी जनतेला धान्य वाटप केले आहे.

शिवसेना मदतीचा आधार तर देणारच आहे. सोबत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का याची माहितीही घेतली जाणार आहे. आठही जिल्ह्यातील माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. दुष्काळाचे राजकारण केले जाणार नाही. सर्वांना सोबत घेवून शिवसेना दुष्काळाचा सामना करण्यासाठी आग्रही आहे असे भाई रामदास कदम यांनी पत्रकारांना सांगीतले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख सुनील धांडे, चंद्रकांत नवले, माजी मंत्री बदामराव पंडित, संजय महाद्वार, बाळासाहेब अंबुरे, सागर बहिर, नितीन धांडे, जयसिंग चुंगडे, भारत जगताप आदी उपस्थित होते.