मालवण समुद्रात दुश्मन झाला चारी मुंडय़ा चित, युद्धनौका, स्फोटकांचा मारा, मरीन कमांडोंचा चाचांवर घातक वार

अजस्र अशा विमानवाहू युद्धनौका, अचूक मारा करणारी हेलिकॉप्टर्स आणि त्यावरून धडकी भरवणाऱया स्पह्टकांचा मारा सुरू असतानाच संपूर्ण काळ्या कपडय़ात पावलांची चाहूलही लावू न देता चपळाईने वार करण्यात तरबेज असलेल्या मरीन कमांडोंनी घातक वार करून दुश्मनाच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि दुश्मनाला चारी मुंडय़ा चित केले. समुद्री चाचांच्या छाताडात गोळी मारून कामगिरी फत्ते करणारे कमांडो आणि युद्धनौका, हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती बघून मालवणच्या समुद्रकिनारी जमलेल्यांच्या तोंडून भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी आसमंत दुमदुमले.

मालवण-तारकर्लीच्या निळय़ा समुद्रात हिंदुस्थानी नौदलाचा ताफा चित्तथरारक कसरती करत आहे. निमित्त आहे 4 डिसेंबरला जलदुर्ग सिंधुदुर्गच्या साक्षीने साजऱया होणाऱया हिंदुस्थानी नौदल दिनानिमित्त सुरू असलेल्या सशस्त्र कवायतींचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ सुरू असलेल्या नौदलाच्या कसरती पाहून बघणाऱयांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते, वीरश्री निर्माण होत होती, छाती अभिमानाने फुलून येत होती.

अजस्र युद्धनौका, हेलिकॉप्टर्स

नौदलाच्या पश्चिम कमांडच्या अजस्र विमानवाहू युद्धनौकांचा ताफा मालवणात दाखल झाला आहे. या ताफ्यात आयएनएस विक्रमादित्य, आयएनएस तलवार, आयएनएस कोलकाता, आयएनएस ब्रह्मपुत्र आणि आयएनएस सुभद्रा या युद्धनौकांसह तेजस, मिग, डॉर्निअर आणि चेतक ही भेदक आणि अचूक मारा करणारी हेलिकॉप्टर्सही लक्ष वेधून घेत होती. अखेर निळ्या समुद्राच्या साक्षीने आसमंतात तिरंगा फडकवत नौदलाने आपली कवायत पूर्ण केली आणि समुद्रीमार्गे आक्रमण झाले तर आम्ही दुश्मनाचा पुरता नायनाट करू, अशी जणू हमीच या कवायतींच्या माध्यमातून नौदलाने दिली.