
मरीन ड्राईव्हवर जॉगिंग, वॉकिंगसाठी येणारे मुंबईकर आणि परदेशी पर्यटकांची गेले महिनाभर ‘नाके’बंदी झाली होती. तेथील जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे त्यांना नाक मुठीत घेऊनच व्यायाम करणे भाग पडत होते, परंतु शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रयत्नांमुळे आता मरीन ड्राईव्हचा किनारा दुर्गंधीमुक्त झाला आहे. जेएसडब्ल्यूच्या स्वच्छतागृहातील दुर्गंधी हटवून दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे.
मरीन ड्राईव्हवर जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने मुंबईकरांच्या सेवेचे निमित्त सांगून महापालिकेकडून स्वच्छतागृहासाठी काही वर्षांपूर्वी जागा मिळवली. तिथे स्वच्छतागृह बांधून फाऊंडेशनने स्वतःचे नावही लावले, परंतु देखभालीकडे पुरते दुर्लक्ष केले. स्वच्छतागृहाखालील ड्रेनेज लाइन निमुळती असल्याने मलमुत्राचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. गेली महिनाभर या स्वच्छतागृहाबाहेर सर्व घाण आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.
जॉगिंगसाठी येणाऱया शिवसेनेच्या माजी महिला संघटक जयश्री बाळ्ळीकर यांनी ही बाब प्रवीण सोनवणे यांच्या निदर्शनास आणून दिली. सोनवणे हे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांनी डॉ. गोऱहे यांना या स्वच्छतागृहाच्या स्थितीची माहिती दिली. डॉ. गोऱहे यांच्या मार्गदर्शनाने सोनवणे यांनी महापालिकेला याची माहिती देताच पालिकेने तातडीने स्वच्छतागृहाची दुरुस्ती हाती घेतली. त्याबद्दल डॉ. गोऱहे यांनी महापालिकेचे आभार व्यक्त केले आहेत. लवकरच दुरुस्ती पूर्ण होऊन मुंबईकरांना हे स्वच्छतागृह पुन्हा वापरता येणार आहे.
























































