
रायपूरच्या आकाशात हिंदुस्थानी फलंदाजांनी शतकांचे फटाके उडवले असले तरी शेवटी मैदानावर सजलेली आगपाखड पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या बॅटमधून झाली. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकांनी हिंदुस्थानने 358 धावांचा डोंगर उभा केला; मात्र एडन मारक्रमचे झुंजार शतक आणि काल नायक न होऊ शकलेला कॉर्बिन बॉश आजचा गेमचेंजर ठरला. या झंझावाती फलंदाजीमुळे कॉर्बिन बॉशने संघाला पॉश विजय मिळवून दिला आणि दक्षिण आफ्रिकेने चार विकेट राखून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता मालिकेचा फैसला विशाखापट्टणम येथे लागेल.
359 धावांचा पाठलाग म्हणजे डोळ्यांत धडकी भरवणारे आकडे वाटत होते. पण मारक्रमने (110) सुरुवातीलाच ‘घाम गाळणारी’ खेळी साकारली. क्विंटन डी कॉक आजही लवकर माघारी परतला. मात्र त्यानंतर टेम्बा बवुमासोबत उभारलेली 101 धावांची भागीदारी म्हणजे हिंदुस्थानी गोलंदाजांसाठी पहिलाच ठोसा होता. 53 धावांवरचा सोडलेला झेल आणि त्यानंतर मारक्रमचा दुणावलेल्या आत्मविश्वासाने सामनाच फिरवला. मग मैदानावर सणासारखी चौकार-षटकारांची आतषबाजी, दवाचा फायदा आणि ‘क्लास’ फलंदाजी करत संघाकडे विजयश्री खेचून आणली.
मारक्रम पॅव्हेलियनकडे वळताच मैदानावर उतरले डेवाल्ड ब्रेव्हिस आणि मॅथ्यू ब्रिझके. ब्रेव्हिसची 34 चेंडूंतील 54 धावांची खेळी म्हणजे शुद्ध वणवा, तर ब्रिझकेची 68 धावांची खेळी म्हणजे शांत पावसासारखी! दोघांची 92 धावांची भागीदारी केली आणि सामन्याची सुई पूर्णपणे आफ्रिकेकडे वळली.
शेवटी रंगला नाटय़ाचा शेवटचा अंक. गेल्या सामन्यात कॉर्बिन बॉश अपयशी ठरला होता, पण आज तो सिंहासारखा गरजला आणि 15 चेंडूंतील नाबाद 29 धावांच्या खेळीने संघाला मालिकेत बरोबरी साधून दिली.
हिंदुस्थानच्या गोलंदाजांना दवाचा फटका बसला. दवाचा फायदा उचण्याची चलाखी करता आली नाही आणि त्यांची पराभवाच्या दिशेने घसरण झाली. प्रसिध कृष्णा सर्वात महागडा गोलंदाज (2/79) ठरला; मात्र अखेरीस प्रसिध आणि अर्शदीप सिंग(2/54) यांनी दिलेले धक्के अपुरे ठरले. कुलदीप, जाडेजाही विशेष काही किमया करू शकले नाहीत.
त्याआधी हिंदुस्थानने उभारलेला 5 बाद 358 चा डोलारा, विराटच्या संयमी 102, गायकवाडचे फटकेबाज 105 आणि के. एल. राहुलच्या शेवटच्या वादळी तडाख्यामुळे हिंदुस्थानचा संघ 358 धावांपर्यंत पोहोचला. यात कोहली-गायकवाडने तिसऱ्या विकेटसाठी केलेली 195 धावांची विक्रमी भागीदारी महत्त्वाची ठरली. कोहली-गायकवाडच्या फटकेबाजीमुळे हिंदुस्थानला 400 धावांचा टप्पाही गाठणे सहज शक्य होते. मात्र दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे राहुल-जाडेजाला शेवटच्या दहा षटकांत 74 धावाच काढता आल्या. त्यापैकी 18 धावा 50 व्या षटकांत निघाल्या.
आज एक विक्रम विराटच्या पुस्तकात लिहिलं गेलं. ते म्हणजे सलग एकदिवसीय डावात 11 व्यांदा शतकी झंझावात. त्याचे मागे एबी डिव्हिलियर्सने सहावेळा हा पराक्रम केलाय. म्हणजे विराटच्या आसपास कुणीच नाही. तसेच ऋतुराज गायकवाडने आपले पहिलेच एकदिवसीय शतक 77 चेंडूंत आणि तेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. हिंदुस्थानी फलंदाजाकडून दुसऱ्या क्रमांकाचं वेगवान शतक

























































