
सामना प्रतिनिधी । हिंगोली
आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीत मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे बुधवारी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करत भजन करण्यात आले. आंदोलनाची कल्पना देऊनही आमदार मुटकुळे हे उपस्थित राहिले नसल्यामुळे संतप्त आंदोलकांनी आमदारांच्या घराच्या दरवाजावर थुंकून निषेध नोंदविला. दरम्यान, खानापुर चित्ता येथे ३०० च्यावर मराठा समाज बांधवांनी मुंडण करुन सरकारचा निषेध केला आहे. गुरुवारी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंद मध्ये हिंगोली जिल्ह्याने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोलीच्या गांधी चौकात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडुन मागील ९ दिवसापासुन ठिय्या आंदोलन सुरु असुन वेगवेगळी अभिनव आंदोलने करुन सरकारचे लक्ष वेधले जात आहे. बुधवारी मराठा समाज बांधवांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या गाडीपुरा भागातील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी विविध वक्त्यांनी सरकारच्या धोरणाचा तसेच आमदारांच्या भूमिकेबाबत रोष व्यक्त केला. आंदोलन होणार आहे हे माहित असून देखील आमदार मुटकुळे घराला कुलूप लावून गेल्यामुळे आंदोलकांनी रोष व्यक्त केला. तसेच उपस्थित आंदोलकांनी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या घराच्या दरवाजावर थुंकून रोष व्यक्त केला.
दरम्यान, ठिय्या आंदोलना दरम्यान परतवारीसाठी नर्सी येथे जाणाऱ्या या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. गुरुवारी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असुन हिंगोली जिल्हृयातील मराठा समाज बांधवांनी गुरा-ढोरांसह रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापारी आस्थापनांनी दुकाने बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखून शांततेने आंदोलन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
summary…maratha andolen at hingoli

























































